
महाराष्ट्र राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी परराज्यातून रेल्वेद्वारे टँकरने ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. ऑक्सिजनच्या रेल्वे वाहतुकीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून रेल्वे मंत्रालयाला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात मेडीकल ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी टँकर कमी पडत आहेत. त्यासाठी नायट्रोजन व आरगॉनची वाहतूक करणाऱया करणाऱया टँकरमध्ये आवश्यक ते बदल करून ऑक्सिजन वाहतूक करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
या ऑक्सिजन टँकरद्वारे परराज्यातून रेल्वे वाहतुकीद्वारे ऑक्सिजन महाराष्ट्रात येत आहे. या ऑक्सिजन वाहतुकीसाठी एक कोटी रुपये आगाऊ (अॅडव्हान्स) देण्याची मागणी रेल्वे मंत्रालयाने केली होती. त्यानुसार ही रक्कम देण्यात येत आहे.






























































