फाटलेले टायर… तुटलेले पत्रे! ‘भंगार’ एसटीतून धावतोय ‘गतिमान’ महाराष्ट्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘निर्णय वेगवान… महाराष्ट्र गतिमान’ अशी टिमकी मिरवत मिंधे सरकार कोट्यवधींची जाहिरात करत आहे, पण प्रत्यक्षात मात्र मुरुड आगाराच्या परिवहन उपक्रमांतर्गत चालवल्या जाणाऱ्या बसेस अक्षरश: खिळखिळ्या झाल्या आहेत. मुरुडच्या एसटी जवळपास भंगार झाल्या असून 25 गाड्या सध्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्याशिवाय फाटलेले टायर, तुटलेले पत्रे, वारंवार बंद पडणाऱ्या गाड्या यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. ‘भंगार’ एसटीतून ‘गतिमान’ महाराष्ट्र धावतोय, असे म्हणण्याची वेळ मुरुडकरांवर आली आहे.

बसेस नादुरुस्त असल्यामुळे अनेकदा रस्त्यावर बंद पडतात. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. एसटी बसेसच्या देखभाल दुरुस्तीकडे सपशेल दुर्लक्ष होत असून अपघाताचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तरी नादुरुस्त बसेसची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी मुरुडकरांनी केली आहे.

मुरुड शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असतानाच एसटी बसेसची संख्यादेखील वाढवणे आवश्यक होते, पण प्रत्यक्षात प्रवाशांचा विचार करता या बसेस अपुऱ्या पडत आहेत. मुरुड आगारातील बहुसंख्य बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यांची देखभाल दुरुस्ती केली जात नाही. यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रार करूनदेखील त्याची दखल घेतली जात नाही. मुरुड आगारातून 40 फेऱ्यांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात 33 फेऱ्या सुरू आहेत. वाढती लोकसंख्या पाहता सुमारे 10 नवीन गाड्या वाढवण्याची गरज आहे. 40 गाड्यांमागे 120 दुरुस्ती कर्मचारी आवश्यक आहेत. मात्र अवघ्या 31 कर्मचाऱ्यांवर दुरुस्तीचा भार पडत आहे.