
गेले काही दिवस संसदेत काँग्रेसवर टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर बुधवारी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी मोदी सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ घोषणेचा समाचार घेताना त्यांनी ‘नवा हिंदुस्थान चीननिर्भर’ असल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 फेब्रुवारीला हैदराबादमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’चे लोकार्पण केले होते. 11 व्या शतकातील संत श्री रामानुजाचार्य यांच्या स्मरणार्थ ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ची निर्मिती करण्यात आली आहे. या पुतळ्याचे कंत्राट चीनच्या एरोसन कॉर्पोरेशनला देण्यात आले होते. त्यावरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
























































