चिपळूणात एक कोटी रुपये खर्चून छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार – पालकमंत्री वायकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या मागणीनुसार चिपळूण नगरपरिषद हद्दीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने याला मंजुर दिली असून पुतळा उभारण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामी सुमारे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार असून पुतळ्याचा खर्च रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर हे स्वत: करणार आहेत.

चिपळूण नगरपरिषदेच्या हद्दीत स्वमालकीच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारुढ पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी सातत्याने लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक जनतेकडून करण्यात येत होती. त्यानुसार चिपळूण नगपरिषदेच्या दिनांक १० सप्टेंबर २०१८ च्या मुख्य सभेत (ठराव क्रमांक ६७) याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला.

हा पुतळा उभारण्यासाठी होणार्‍या खर्चास नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची संरक्षण करण्याची जबाबदारी देखील नगरपरिषदेने ठरावाद्वारे घेतली आहे. परंतु पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाकडून आवश्यक ती परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याने पुतळा उभारण्याचे कामही रखडले होते. याप्रश्‍नी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी शासकीय निवासस्थानी कला संचालक मिश्रा यांच्या समवेत बैठक घेतली. या बैठकीनंतर कला संचालनालयाने १५ जानेवारी २०१९ रोजी पुतळा उभारण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे चिपळूण नगरपरिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फेब्रुवारीच्या अंतिम आठवडयात पुतळा उभारण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्वखर्चाने उभारण्यात येणार असून पुतळ्यासाठी आवश्यक चौथरा तसेच सभोवतालील सुशोभिकरण व अन्य कामांसाठी सुमारे रुपये १ कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात येणार आहे. – रवींद्र वायकर, पालकमंत्री