नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी शिवसेनेच्या पाठीशी राहा, आदित्य ठाकरे यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजकारणात चांगल्या लोकांनाही स्थान असते, हे दाखवून देण्यासाठी आणि नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी शिवसेनेच्या पाठीशी आपले आशीर्वाद असू द्या, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले.

आमदार आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा काल गुरुवारी आणि आज शुक्रवारी नाशिक जिह्यात व संभाजीनगर येथे झाली. इगतपुरी, घोटी, नाशिक, पिंपळगाव बसवंत, चांदवड, मनमाड, येवला येथे आदित्य ठाकरे यांचे शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले. गुरुवारी रात्री नाशिकच्या गोविंदनगर येथे, तर शुक्रवारी नांदगाव मतदारसंघातील मनमाड येथे आणि रात्री संभाजीनगर येथे आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. राज्यभर गद्दारांविरुद्ध मोठय़ा प्रमाणात चीड दिसून येत आहे. मित्रपक्षाने नाही तर आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला. आम्ही विश्वास ठेवून या गद्दारांना पात्रतेपेक्षा जास्त देत गेलो. त्यांच्यावर बारकाईने लक्ष दिले नाही. उद्धव ठाकरे यांनी राजकारणापेक्षा समाजसेवेला जास्त महत्त्व दिले. आमच्या विधानसभेतील प्रवेशाने ते काय करीत होते हे निदर्शनास येईल, या भीतीने या गद्दारांच्या पोटात गोळा उठला होता. विधानसभेत आम्ही गेल्यापासूनच त्यांचे दुखणे बळावले होते, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी गद्दारांवर केला. माणुसकी नसलेले सध्याचे राजकारण तुम्हाला पटतेय का, असा सवाल करताच ‘नाही… नाही…’चा आवाज घुमला. हे राजकारण बदलण्यासाठी शिवसेनेसोबत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार का, असा सवाल करताच ‘हो… हो…’चा नारा उपस्थितांनी दिला.

देशातील राजकारणाचे सध्याचे चित्र बदलण्यासाठी, चांगल्या लोकांनाही राजकारणात स्थान असते हे दाखवून देण्यासाठी, नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी आपले आशीर्वाद शिवसेनेच्या पाठीशी राहू द्या, अशी साद आदित्य ठाकरे यांनी घातली. सामान्यांना मोठं करण्याची ताकद ही शिवसेनेत आहे व ती सामान्यांचीच आहे, ही ओळख कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात, गद्दारी का केली याचे उत्तर द्यायचे असते. मी शिवसैनिकांना, नागरिकांना उत्तर द्यायला बांधील आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

…तर लोक गाडतील

आज जे दादागिरी, गुंडगिरी दाखवायचा प्रयत्न करतायत त्यांनी गुंडगिरी सोडावी. गुंडगिरीचा काळ गेला. लोकांची सेवा करा, सत्य बोला, लोक डोक्यावर घेऊन नाचतील. पण लोकांना फसवतच राहिलात, गुंडगिरी करत राहिलात, तर लोक तुम्हाला गाडतील. ही लोकशाही आहे, हा तुमचा आवाज मतदानाच्या मतपेटीत जेव्हा जातो तेव्हा तो बुलंद होतो, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.