
सामना प्रतिनिधी । नगर
संपूर्ण जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या बुर्हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिरात शनिवारी पहाटे धाडसी चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून देवीचा मुकुट, छत्री, सिंह अशा चांदीच्या दागिन्यांसह पोबारा केला. मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रकमेवरही डल्ला मारला. अज्ञात पाच चोरट्यांनी सुमारे चार लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या चोरीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बुर्हाणनगरच्या देवी मंदिरात प्रथमच चोरीची घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती जिल्हा पोलीसा अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घेवुन विविध ठिकाणी पाच पथके तपासासाठी रवाना केली आहे.
मंदिराचे पुजारी विजय भगत म्हणाले की, शनिवारी पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास पाच अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. देवीच्या अंगावर असलेले चांदीचे दागिणे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे होते. या सर्व दागिण्यांची चोरट्यांनी चोरी केली आहे. दानपेटीत सुमारे 50 हजारांची रोकडे असावी, असे ते म्हणाले. नेहमीप्रमाणे भगत हे मंदिरात पूजा-अर्चा करण्यासाठी आले असता, त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने भिंगार कँप पोलिसांना चोरीची माहिती दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, कँप पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील, पो. ना. राजेंद्र सुद्रिक यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आहे. सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन शर्मा यांनी तपासाच्या कामाला गती दिली. पुजारी विजय भगत यांनी कँप पोलीस ठाण्यास कळविले आहे. आगडगाव येथील जागृत देवस्था भैरवनाथ मंदिरात अशाच प्रकारे चोरी झाली होती. चोरटे हे तरुण असल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. जागृत देवी म्हणून तुळजाभवानी माता प्रसिद्ध आहे. चोरट्यांची नजर आता थेट मंदिरातील दागिण्यांवर पडल्याने ग्रामस्थांनी सतर्क राहाण्याची गरज निर्माण झाली आहे.
पाच पथकांची नियुक्ती
बुर्हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिरात शनिवारी पहाटे धाडसी चोरी करणार्यांचा तातडीने तपास लागावा यासाठी आज सकाळी जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मंदीर परिसराची पाहणी करुन माहिती घेतली. स्थानिक गुन्हा अन्वेशन पथकाला या घटनेचा तातडीने तपास करण्याचे आदेश देण्यात आले असून यासाठी पाच पथके नियुक्त करण्यात आले आहेत.






























































