
शहरातील लातूर – नांदेड रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी असलेले एटीएम मशीन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी पहाटे चारच्या सुमारास घडली आहे, चोरट्यांच्या वाहनाचा पोलिसांनी पाठलाग केला, परंतु त्यांना गुंगारा देऊन 16 लाख 70 हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले असून एटीएमचे रिकामी मशीन पोलिसांच्या हाती लागले आहे.
चाकूर शहरात मागील काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले आहे, वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. लातूर – नांदेड रस्त्यावरील त्रिमूर्ती चौकात बँक आँफ इंडियाचे एटीएम आहे. या एटीएममध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास तीन ते चार व्यक्ती एटीएम मशीन चोरून नेत होत्या. शेजारच्या महिलेने आरडाओरड केल्यानंतर चोरट्यांनी एटीएम मशीन वाहनात टाकून पळ काढला, याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर चाकूर व अहमदपूरच्या पोलिसांनी चोरट्याच्या वाहनाचा पाठलाग केला. सुनेगाव सांगवी (ता.अहमदपूर) जवळील पुलाच्या खाली एटीएम मशीन टाकून त्यातील पैसे घेऊन चोरट्यांनी पोलिसांना गुंगारा दिला.
एटीएम मशिनमध्ये मंगळवारी सायंकाळी पैसे भरण्यात आले होते. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांनी भेट दिली. सुनेगाव सांगवी येथे स्थानिक रिकामे एटीएम मशीन सापडले असून या ठिकाणी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. याबाबत सचिन चौधरी यांनी 16 लाख 70 हजार रुपयांची रक्कम चोरीला गेली असल्याची तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटेपासून पोलिसांच्या सर्व यंत्रणा याचा तपास करीत असल्या तरी पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही.
























































