दलित तरुणाच्या लग्नाच्या मिरवणुकीवर दगडफेक, गुजरात पोलिसांचा तपास सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातच्या पाटण येथे एका दलित व्यक्तीच्या लग्नाच्या मिरवणुकीवर अज्ञात व्यक्तींनी केलेल्या दगडफेकीत गुरुवारी दोन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अहमदाबाद मिररने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

पोलिसांनी भातसन गावात धाव घेतली आणि वराच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवली आणि लग्नाची मिरवणूक काढण्यास मदत केली. सुरुवातीच्या तपासानुसार, दलितांविरुद्ध कोणत्याही भेदभावातून किंवा द्वेषातून मिरवणुकीवर हल्ला झाला नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक विजय पटेल यांच्या म्हणण्यानुसार, ‘भव्य विवाह समारंभांवर होणारा अनावश्यक खर्च थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीने सहा वर्षांपूर्वी एक ठराव केला होता की, कोणत्याही जातीचे असो, कोणत्याही कुटुंबाला लग्नसमारंभात मिरवणूक काढण्याची परवानगी नाही. पण इथे वराच्या कुटुंबाने मिरवणूक काढण्याचा आग्रह धरला.’

विजय परमार यांची घोड्यावरून मिरवणूक जात असताना काही लोकांनी दगडफेक केली आणि या घटनेत दोन जण जखमी झाल्याचे पटेल यांनी सांगितले.

‘आम्ही पोलीस संरक्षण दिले आणि मिरवणूक शेजारच्या गावात पोहोचण्यास मदत केली. कुटुंब लग्नात व्यस्त असल्याने आणि परतले नसल्याने, अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही’, एसपी म्हणाले.