
पॉर्न फिल्म निर्मितीच्या आरोपाखाली अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती, प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्रा सध्या अटकेत आहे. याप्रकरणी पहिल्यांदाच शिल्पाने मौन सोडले आहे. सोशल मीडियावर आज एक निवेदन प्रसिद्ध करत ‘माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या प्रायव्हसीचा आदर करा तसेच मीडिया ट्रायल थांबवा,’ अशी विनंती तिने केली आहे.
शिल्पाने पोस्टमध्ये लिहिलेय, ‘गेले काही दिवस आमच्यासाठी आव्हानात्मक होते. अनेक अफवा आणि आरोप सुरू आहेत. माध्यमांनी आणि काही लोकांनी माझ्याविषयी अनेक अनावश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. माझ्या कुटुंबीयांना ट्रोल केले, प्रश्न विचारले गेले. याप्रकरणी मी माझी भूमिका मांडली नाही. कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे माझे नाव घेऊन कोणत्याही चुकीच्या बातम्या पसरवू नका.’
मुंबई पोलीस, न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास
पुढे तिने म्हटलेय, ‘एक सेलिब्रेटी म्हणून कधीही तक्रार करू नका, कधीही कोणाला समजावून सांगू नका’ या तत्त्वाचे मी पालन करते. या प्रकरणाचा तपास सुरू असून माझा मुंबई पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. एक कुटुंब म्हणून आमच्यासमोर उपलब्ध असलेल्या सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करू. तोपर्यंत एक आई म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करते की, माझ्या मुलांच्या भविष्यासाठी आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. सत्यता पडताळल्याशिवाय अर्धवट माहितीवरून वक्तव्य करू नका.
पुढे विनंती करत ती म्हणाली, मी कायद्याचे पालन करणारी एक हिंदुस्थानी नागरिक असून गेल्या 29 वर्षांपासून मेहनत करतेय. लोकांचा माझ्यावर असलेला विश्वास मी कधीच कमी होऊ देणार नाही. माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या प्रायव्हसीचा आदर करा. आमची मीडिया ट्रायल करू नका. सत्यमेव जयते!’



























































