
सामना प्रतिनिधी, नागपूर
आधीच दुष्काळाने अवघा महाराष्ट्र होरपळला आहे. यंदा पावसाचे प्रमाणही सरासरीपेक्षा कमी राहिल्याने पाण्याचे साठे कमी आहेत. त्यातच सरकारने समृद्धी महामार्गासारखा ड्रीम प्रोजेक्ट आकाराला आणण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी प्रचंड पाणी वापरले जात आहे, तर दुसरीकडे उसाच्या पिकाला प्रचंड पाणी घालावे लागत आहे. असेच होत राहिले तर राज्यात दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे राज्यातले पाण्याचे साठे टिकवायचे असतील तर आधी समृद्धी महामार्ग आणि उसाच्या पिकावर बंदी घाला अन्यथा भीषण दुष्काळ उभा राहील, असा इशारा अर्थतज्ञांनी सरकारला दिला आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा सरकारच्या विविध प्रकल्पांपैकी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गाच्या निर्मितीसाठी प्रचंड प्रमाणावर पाणी खर्च करावे लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा प्रकल्प आकाराला येण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत, परंतु हा महामार्ग बांधणे म्हणजे राज्यातले मोठय़ा प्रमाणावरील पाण्याचे साठे त्यात खर्च करणे. त्यामुळे या महामार्गाचे काम ताबडतोब थांबवावे असे मत अर्थतज्ञ आणि राज्याच्या नियोजन महामंडळाचे माजी सदस्य एच. एम. देसरडा यांनी मांडले आहे. देसरडा यांनी याप्रकरणी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि सरकारला समृद्धी महामार्गासारखे मोठे प्रकल्प थांबवले नाहीत तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला.
देसरडा यांचे सरकारला सवाल
राज्यात सध्या दहा लाख हेक्टर्सवर उसाचे पीक घेण्यात आले आहे. या पिकाला 100 कोटी जनतेला लागणारे पाणी वापरावे लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला जनता हवी आहे की उसाचे पीक याचा विचार करा. राज्यात विविध उद्योग बंद पडत असताना समृद्धी एक्प्रेस-वेच्या बाजूला अनेक उद्योग उभे राहतील अशी अपेक्षा सरकार कशी काय करू शकते? पाणीच उपलब्ध नसल्याने दुष्काळी भागातून मोठय़ा संख्येने जनता शहराकडे वळत आहे. बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ आणि राज्याच्या विविध भागांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. यूपी-बिहारमध्ये उसाचे पीक चांगले येते. कारण तेथील पीक पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, तर महाराष्ट्रातील उसाचे पीक हे जमिनीतील पाण्याच्या साठ्यावर अवलंबून आहे.
मद्यनिर्मितीसाठी पिकांची लागवड आणि मोठमोठे प्रकल्प
मद्यनिर्मितीसाठी ऊस आणि केळय़ांच्या बागा यांचे पीक मोठय़ा प्रमाणावर घेण्यात येत आहे. या पिकांना मोठ्या प्रमाणावर पाणी लागते, तर दुसरीकडे सरकार मोठमोठे बांधकाम प्रकल्प हाती घेत आहे. त्यासाठीही मोठय़ा प्रमाणावर पाणी लागते. सरकारने पाणीसाठय़ांचा जराही विचार केलेला नाही. त्यामुळे राज्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागणार असल्याचेही देसरडा यांनी सांगितले.
राज्याचे धोरण फसवे
दुष्काळ हा निसर्गनिर्मित नाही. सरकारच्या धोरणांमुळेच हा दुष्काळाचा राक्षस उभा राहिला आहे. त्याला सरकारनेच पोसले आहे. सरकारचे विविध प्रकल्पच आणि फसवे धोरणच त्यासाठी कारणीभूत आहे अशा शब्दांत देसरडा यांनी सरकारच्या धोरणांवर आसुड ओढले. जमिनीतील पाण्याचे साठेही संपुष्टात येत चालले आहेत. गेल्या 40 वर्षांत पाण्याचा प्रचंड उपसा झाला असून 1961 मध्ये महाराष्ट्रातल्या कृषिपंपांची संख्या एक लाख होती. आता ही संख्या 40 लाख इतकी झाली आहे.
summary- stop super express way says economist



























































