
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
पाण्यावरून राज्या-राज्यांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे नदीजोड प्रकल्प रखडला असल्याची स्पष्ट कबुली केंद्रीय जलसंधारण सचिव यू.पी. सिंग यांनी दिली. या वादावादीमुळे नदीजोड प्रकल्प कधी पूर्ण होईल हे सांगता येणे अशक्य असल्याचेही सिंग यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेच्या समारोपानंतर केंद्रीय जलसंपदा विभागाचे सचिव यू. पी. सिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशातील पाणीप्रश्नावर तोडगा म्हणून ३० नद्या जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. मात्र सध्या राज्या राज्यात पाणी वाटपावरून वाद सुरू आहेत. काही प्रकरणे लवादासमोर आहेत. त्यामुळे नदीजोड प्रकल्प कधी प्रत्यक्षात येईल हे सांगणे कठीण असल्याचे सिंग यांनी कबूल केले. राज्यांनी आपसांत समन्वय साधल्यास यातून मार्ग निघू शकतो, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात ठिबक आणि तुषार सिंचन वाढवण्यासाठी केंद्रीय पातळीवरून प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती यू. पी. सिंग यांनी दिली. देशात पाऊस चांगला पडतो, पण पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे ते म्हणाले. शेती सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. यात राज्य सरकारचा पुढाकार अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.






























































