दिल्लीतील प्राणीसंग्रहालयात घुसून भटक्या कुत्र्यांनी 3 हरणांचा घेतला बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्राणिसंग्रहालयात घुसलेल्या भटक्या कुत्र्यांनी तीन हरणांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. 11 नोव्हेंबरच्या रात्री ही घटना घडली. प्राणीसंग्रहालय प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याबद्दल प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली प्राणिसंग्रहालयात घुसलेल्या कुत्र्यांनी तीन हरणांना ठार केले आहे. ज्यामध्ये दोन हॉग डीअर आणि एका सिका हरणाचा समावेश होता. प्राणीसंग्रहालयातील अधिकारी परिसराची पाहणी करत असताना हरिण मृत अवस्थेत आढळून आले.

प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. यासोबतच निजामुद्दीन रेल्वे यार्डाजवळील जनता बस्ती परिसरातील प्राणीसंग्रहालयाच्या सीमा भिंतीची उंची वाढवण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. याबद्दल नुकताच पदभार स्वीकारलेल्या संचालिका आकांक्षा महाजन यांनी सांगितले की, प्राणीसंग्रहालयाच्या सीमाभिंतीबाहेर नागरिक आणि जेजे कॉलनी वसाहतीमधून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे प्राणिसंग्रहालयाच्या हद्दीच्या उंचीइतका कचऱ्याचा ढीग जमा झाला आहे. यामुळे भटके कुत्रे प्राणीसंग्रहालयात प्रवेश करतात.

त्यांनी सांगितले की प्राणीसंग्रहालयाने भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आणि कचरा उचलण्यासाठी एमसीडीला पत्र लिहिले आहे. तर रेल्वेला प्राणीसंग्रहालयालगतचा परिसर रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे. प्राणिसंग्रहालयाची सीमा भिंत उभारण्यासाठी 2-3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.