नागपूर – डुकरं पकडणाऱ्यांना पोलीस संरक्षण दिले, वाचा काय आहे कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूर महापालिकेने रस्त्यावर भटकणारी डुकरं पडण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी त्यांनी तमिळनाडूहून खास प्रशिक्षित माणसेही बोलावली आहेत. डुकरं पकडणाऱ्या या पथकाला पोलिसांचे संरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य झाल्याने डुकरं पकडणाऱ्यांच्या संरक्षणासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ही मोहीम 10 दिवस चालणार असून बुधवारपासून या मोहिमेला सुरुवात झाली. या पथकामध्ये तमिळनाडूच्या प्रशिक्षित लोकांसह एकूण 20 जणांचा समावेश असून, पहिल्या दिवशी या पथकाने 10 डुकरं पकडली.

नागपुरातील रस्त्यावर जवळपास 4 हजार डुकरं फिरत असतात. त्यांना पकडत असताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी नागपूर महानगरपालिकेने पोलिसांकडे संरक्षणाची विनंती केली होती. 2019 साली महापालिकेने अशीच एक मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी डुकरं पाळणाऱ्यांनी या पथकावर हल्ला केला होता. अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी हे संरक्षण मागण्यात आलं होतं. नागपुरात काही लोकं डुकरांच्या मांसासाठी ती पाळतात, मात्र ही डुकरं एका जागी बंदीस्त ठेवण्याऐवजी ती रस्त्यावर मोकळी सोडून देतात. या मोकाट डुकरांचा नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या ज्यामुळे डुकरं पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.