
मुंबईचे फुप्फुस मानल्या जाणाऱया आरे कॉलनीवर पुन्हा कुऱ्हाड उगारण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधात रविवारी हजारो मुंबईकरांनी एल्गार पुकारला. दुर्मिळ वनसंपदेसह शेकडो वन्यजीवांचे अधिवास असलेल्या आरे कॉलनीतच मेट्रो-3च्या कारशेड प्रकल्पाचा अट्टाहास कशाला? असा ‘आरेला कारे’चा जाब नव्या शिंदे सरकारला विचारण्यात आला. आरेच्या जंगलात कारशेड उभारण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयाचा मुंबईसह राज्यभरातील पर्यावरणवाद्यांनी आरे कॉलनीत तीव्र निदर्शने करून निषेध केला.
तीन वर्षांपूर्वी तत्कालीन फडणवीस सरकारने पर्यावरणवाद्यांच्या विरोधाला न जुमानता मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडांची एका रात्रीत बेसुमार कत्तल केली. त्यावर मोठा असंतोष उसळला होता. नंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने पर्यावरणाचा विचार करीत मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्गला हलवून आरे कॉलनी वाचवली. मात्र देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा सत्तेत स्थान मिळताच त्यांनी वादग्रस्त मेट्रो कारशेड प्रकल्प आरेतच करणार, अशी हट्टवादी भूमिका कवटाळली आहे. त्यावर पर्यावरणवाद्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे.
रविवारी सकाळी हजारो मुंबईकरांनी आरे कॉलनीकडे मोर्चा वळवला आणि आरेचे जंगल वाचवण्यासाठी पुन्हा आंदोलनाची मोहीम उभारत नव्या शिंदे सरकारला ‘आरेला कारे’चा जाब विचारला. आरे कॉलनीतील पिकनिक पॉईंटवर अनेक पर्यावरणवादी संघटनांचे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने एकत्र जमले. त्यांनी सनदशीर मार्गाने तीव्र निदर्शने करीत ‘आरेला कारे’चा आवाज बुलंद केला. आमचा कारशेडच्या प्रकल्पाला मुळीच विरोध नाही. मात्र पर्यावरण उद्ध्वस्त करून, झाडांची कत्तल करून आम्ही कुठलाच विकास प्रकल्प होऊ देणार नाही. आरेचे जंगल हे केवळ मुंबईकरांना प्राणवायू पुरवत नाही, तर या जंगलात दुर्मिळ प्रजातींसह बिबटय़ा व इतर 300 हून अधिक वन्यजीवांचा अधिवास आहे. तसेच जवळपास 5 लाख झाडे, नद्या व तलावे आहेत. कोटय़वधींचा प्रकल्प राबवताना या वन्यजीवांचा व वृक्षसंपदेचा विचार नवे सरकार का करीत नाही? ठाकरे सरकारने संरक्षित जंगल घोषित केलेल्या आरेतच पुन्हा कारशेड प्रकल्प राबवण्याचा अट्टाहास कशासाठी? असे सडेतोड सवाल पर्यावरणप्रेमींनी रविवारी आंदोलनादरम्यान उपस्थित केले. ‘मुंबईला मोकळा श्वास घेऊ द्या’, ‘आरेचे जंगल वाचलेच पाहिजे’, ‘झाडांवर कुऱहाड चालवू देणार नाही’, अशा घोषणा देत पर्यावरणवाद्यांनी आरेचा परिसर दणाणून सोडला.
कारशेड, स्टेशन, बांधकाम प्रकल्प…‘आरे’चे पूर्ण जंगल उद्ध्वस्त होणार
‘वनशक्ती’ संस्थेचे पदाधिकारी डी. स्टॅलिन यांनी शिंदे सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. आरेच्या जंगलात केवळ मेट्रो कारशेड उभारले जाणार नसून त्याआडून रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठमोठय़ा विकासकांना रान मोकळे करून देण्याचा घाट आहे. या जंगलात मेट्रो स्टेशन व स्टेशनजवळ 90 एकरच्या एसआरए प्रकल्पाची योजना आहे. एसआरए प्रकल्पात दीड लाख लोक राहायला येतील. तसेच प्राणीसंग्रहालय, मेट्रो भवन, आरटीओ टेस्टींग सेंटरह, लेबर कॅम्प आदींसाठी अनेक भूखंड ताब्यात घेतले आहेत. कारशेडमुळे हे सर्व छोटे-मोठे प्रकल्प राबवले जाणार असून यामुळे आरेचे संपूर्ण जंगल उद्ध्वस्त होईल, अशी भिती स्टॅलिन यांनी व्यक्त केली आहे.
आरेत कारशेड उभारण्यासाठी काही अदृश्य शक्तींचा दबाव! वनशक्ती संस्थेचा आरोप
कांजूरमार्गच्या भूखंडावर मेट्रो-3 आणि मेट्रो-6 मार्गिकेचे कारशेड उभारणे व्यवहार्य होते. पण हा कारशेड प्रकल्प पुन्हा आरे कॉलनीमध्ये आणण्यासाठी काही अदृश्य शक्तींचा नव्या सरकारवर प्रचंड दबाव आहे, असा गंभीर आरोप वनशक्ती संस्थेचे पदाधिकारी डी. स्टॅलिन यांनी केला आहे. कारशेडमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम भोगावे लागणार आहेत. कारशेडसाठी झाडांची कत्तल केली जाईल. त्यामुळे 62 हेक्टरचे जंगल उद्ध्वस्त होईल. तसेच मेट्रो रेक धुण्यासाठी दररोज 50 हजार लिटर पाणी वाया जाईल, असे स्टॅलिन यांनी नमूद केले.
नाकापेक्षा मोती जड होईल – फडणवीस
आरेतील कारशेडविरोधात पर्यावरणवाद्यांनी सुरू केलेल्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी प्रतिक्रिया दिली. सर्वेच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर कारशेड प्रकल्प सुरू केला होता. आतापर्यंत 25 टक्के काम पूर्ण झाले असून आता झाडे कापण्याची गरज नाही. काही पर्यावरणवाद्यांना याची माहिती नसल्याने ते आंदोलन करताहेत. मेट्रो कारशेड जर कांजूरला नेले तर बांधकामाला 4 वर्षे लागतील तसेच आणखी 10 ते 15 हजार कोटींचा खर्च येईल. आधीच 10 हजार कोटींचा खर्च झाला आहे. त्यामुळे नाकापेक्षा मोती जड होईल. मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी पर्यावरणपूरक निर्णय घेऊ, पर्यावरणवाद्यांचा आदर राखून चर्चा करू, असे फडणवीस म्हणाले.
मुंबईकरांना धोका देऊ नका! आदित्य ठाकरे यांचा टोला
आम्हाला धोका दिला ठीक आहे, पण मुंबईकरांना धोका देऊ नका, असा टोला शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला लगावला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारला माझी नम्र विनंती आहे की, त्यांनी आरेच्या जंगलात मेट्रो कारशेड बांधण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. कृपया आमचा राग मुंबईकरांवर काढू नये! आम्ही राज्यात सत्तेवर येताच यातील 800 एकर जागेला जंगल म्हणून मान्यता दिली. त्याचबरोबर मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले. मात्र हे करत असताना मेट्रो-3सह सर्व कामांना पूर्ण पाठिंबा दिला. आरे कारशेडला महाविकास आघाडी सरकारने कांजूर मार्गचा पर्याय दिला होता. मेट्रो-6 लाईनसाठी कारशेडला कांजूर मार्ग किंवा गोरेगाव पहाडी येथे कारशेड असावी असे 2018लाच निश्चित करण्यात आले होते. या कारशेडचा वापर मेट्रो-3साठीपण करता येऊ शकतो. त्यामुळे आरे येथे मेट्रो कारशेड उभारण्याबाबत नव्या सरकारने पुनर्विचार करावा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.






























































