मोदी-अदानी भाई भाई…विरोधकांची घोषणाबाजी; सरकारला घेरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या विधानावरून काहूर माजवू पाहणाऱ्या सरकार पक्षाला आज विरोधकांनी एकजुटीने ‘मोदी-अदानी भाई भाई’ अशा घोषणा देत जोरदार प्रत्युत्तर दिल्याने सरकार संसदेच्या दोन्ही सभागृहांत बॅकफूटवर गेले. राहुल गांधी यांनी माफी मागावी आणि राहुल संसदेत येत नाहीत तोवर त्यांच्या सहकाऱयांनी या विधानाचा निषेध करावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आजही संसदेत लावून धरली. विरोधकांनी ‘मोदी-अदानी भाई भाई’च्या घोषणा देत दोन्ही सभागृहे दणाणून सोडली. परिणामी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी दोन व त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

 ‘नाटू नाटू’चे तरी श्रेय घेऊ नका…

राज्यसभेत ‘नाटू नाटू’ या गाण्याला व ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला ‘ऑस्कर’ मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांनी मांडला. त्याला सभागृहाने एकमुखाने अनुमती दिली. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या भाषणात तिरकस शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता टोले लगावले. दोन्ही पुरस्कार दक्षिण हिंदुस्थानातील कलाकृतींना मिळाले आहेत त्याचा आनंद विलक्षण आहे. मात्र ‘नाटू नाटू’चे श्रेय सरकारने घेऊ नये, मीच गाणे रचले, मीच दिग्दर्शित केले, मीच गाणे लिहिले असे उद्या कोणी म्हणू नये, असे खरगे यांनी म्हणताच विरोधकांसह सत्ताधारीही हास्यकल्लोळात बुडाले. केंद्रीय मंत्री जयशंकर व पीयूष गोयल यांनाही या टिप्पणीवर हसू आवरले नाही.

 विरोधकांची रणनीती

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये लोकशाहीविरोधी विधान केल्याचा कांगावा सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. आजही या विषयावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले. मात्र सरकारच्या या कांगाव्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी विरोधकांनी विरोधी पक्षनेते व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात रणनीती आखली. या बैठकीला विरोधी पक्षाचे जवळपास सर्वच महत्त्वाचे नेते उपस्थित होते. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी या बैठकीत पक्षाचे प्रतिनिधित्व केले.