
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱयाबाबत भाजपने केलेल्या वक्तव्याचा राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चांगलाच समाचार घेतला. ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱयावर टीका करणारे भाजपचे नेते गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या दौऱयाचा निषेध कधी करणार याची वाट पहात आहोत, असा टोला सुभाष देसाई यांनी लगावला तर इतर राज्यांतील मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या दौऱयावर आले की ते उद्योगधंदे पळवायला येतात असे नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी सुनावले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसांचा मुंबई दौरा केला. यावर महाराष्ट्रातील उद्योग पश्चिम बंगालमध्ये पळविणार का, असा प्रश्न भाजप नेते आशीष शेलार यांनी केला होता. त्याला राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी जोरदार पत्युत्तर दिले.
वर्षभरापूर्वी मुंबईत आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा त्या वेळेस निषेध का केला नाही, असा सवाल सुभाष देसाई यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
भाजपची पोटदुखी
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व ममता बॅनर्जी यांच्यात झालेल्या बैठकीबाबत आशीष शेलार यांनी केलेले वक्तव्य विसंगती दर्शविणारे आहे. दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली असेल. परंतु भाजपची खरी पोटदुखी वेगळी आहे. सध्या भाजप सर्व पातळय़ांवर मागे पडत आहे. प्रादेशिक पक्ष पुढे जातील, या भीतीमधून असे वक्तव्य केले जात असल्याचे देसाई म्हणाले.
आम्ही पळवापळवी करीत नाही
उद्योगवाढीसाठी आम्ही इतर राज्यांत जात नाही किंवा पळवापळवी करत नाही तर परदेशात जातो. गुंतवणूक वाढवितो. उद्योग पळविण्यावर आमचा विश्वास नाही. जेव्हा सर्व अर्थव्यवस्था ठप्प होती तेव्हा महाष्ट्रातील उद्योग थांबू दिला नाही. 60 देशांसोबत कोटय़वधींचे सामंजस्य करार केले. नुकतेच दुबई येथील एक्सोमध्ये 15 हजार कोटी रुपयांचे करार केले. अनेकांना सुविधा दिल्या आहेत. महाराष्ट्र उद्योगांना आकर्षित करतो. महाराष्ट्राबद्दल शंका घेण्याचे कारण नाही, असे सुभाष देसाई म्हणाले.
मुंबईत वित्तीय केंद्राला जागा
महाराष्ट्रात होऊ घातलेले जागतिक आर्थिक विकास पेंद्र गुजरातला हलविण्याचा डाव भाजपने रचला. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असताना जागतिक वित्तीय केंद्र गुजरातला हलविण्याचा प्रयत्न झाला. परंतु पाच वर्षांत तो यशस्वी झाला नाही. राज्य सरकार मुंबईत जागतिक दर्जाचे वित्तीय केंद्र उभारण्यासाठी जागा देणार आहे, असेही सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.
म्हणून सरकारचा रेड कार्पेट
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आशीष शेलार यांना सुनावले. आपल्या राज्यात उद्योग यावेत म्हणून संबंधित सरकारे रेड कार्पेट टाकतात. विविध सवलती देतात. म्हणून दौरे असतात, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाणार नाहीत
देशातील उद्योजकांची पहिली पसंती ही महाराष्ट्र राज्याला आहे. राज्यात असलेल्या उद्योगस्नेही वातावरणामुळे अनेक गुंतवणूकदार पुढे येत आहेत. देशातील सर्वाधिक परदेशी गुंतवणूक ही आपल्या राज्यात होते. त्यामुळे राज्यातील उद्योग बाहेर जाणार नाहीत, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज व्यक्त केला. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. गुजरात येथे केंद्र सरकारच्या मान्यतेने केंद्र सुरू झालेले असले तरी लवकरच सरकार मुंबईत व्यापार केंद्र उभारेल, असेही सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले.



























































