
तंत्रशिक्षण विभागाच्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना राखीव प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली मूळ कागदपत्रे दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चितीच्या शेवटच्या तारखेच्या आत सादर करण्याच्या सूचना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिल्या आहेत. या मुदतीत कागदपत्रे सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे राखीव प्रवर्गातून प्रवेश रद्द होणार असून कागदपत्रांअभावी या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागणार आहे.
नोव्हेंबरपासून सीईटी सेलच्या वतीने तंत्रशिक्षण विभागातील शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. सीईटी सेलने राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ईडब्लूएस, एनसीएल आणि सीव्हीसी, टीव्हीसी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाच्या पावतीच्या आधारे त्या-त्या प्रवर्गातून प्रवेश घेण्याची मुभा दिली होती. पहिल्या आणि दुसऱया फेरीतील राखीव प्रवर्गातील प्रवेश गुणवत्तेच्या आधारे याच पद्धतीने झाले आहेत. मात्र सदरचे प्रवेश हे तात्पुरत्या स्वरूपातील असून राखीव प्रवर्गाची मूळ कागदपत्रे सादर केल्यावरच विद्यार्थ्यांचे प्रवेश ग्राह्य धरले जाणार आहेत.






























































