
गणपतीपुळे येथील समुद्रात पोहायला गेलेले चार जण बुडत होते. समुद्रकिनाऱ्यावरील मोरया वॉटर स्पोर्टच्या बोटचालकांनी बुडणाऱ्या चौघांनाही वाचवले. ही घटना रविवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. बुडणाऱ्या चौघांनाही वाचवण्यात यश मिळाले आहे.
गणेश सुतार (35), शमाली सूर्यवंशी (38), मृदुला सूर्यवंशी (18) व मंदी सूर्यवंशी (14) अशी बुडणाऱ्या चौघांची नावे आहेत. हे सर्वजण सातारा नांदवडे तालुका कोरेगाव येथील रहिवासी आहेत. या चौघांनाही वाचवण्यात यश आले आहे. हे चौघेजण पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या खाऊ लागताच मदतीसाठी आरडाओरडा केला.
समुद्रकिनाऱ्यावर उभ्या असलेल्या बोट चालकांच्या काहीजण बुडत असल्याचे लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी त्यांची बोट समुद्रात नेली आणि बुडणाऱ्या चार जणांना वाचवले. यावेळी गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर असलेले गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक अक्षय माने व गणपतीपुळे देवस्थानचे सुरक्षारक्षक पवार यांनी ही पर्यटकांना वाचविण्यासाठी बोट चालकांना मदत केली.


























































