विहीरीत पडलेल्या डुकराला वाचवण्यात वनविभागाला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

संगमेश्वरपासून सात किलो मीटर अंतरावरील फणसवणे लांबे वाडी येथील एका पडक्या विहीरीत पिल्लांसह पडलेल्या डुकराला वाचवण्यात वनविभागाला यश आले असले तरी, पाच ते सहा पिल्लांचा अंत झाला.

फणसवणे विचारे वाडी, लांबे वाडी जवळ घर बांधण्यासाठी जागा साफ करत असतांना जवळच असणाऱ्या पडक्या विहीरीत एक डुक्कर पडल्याचे कामगारांच्या लक्षात आले. जवळ जाऊन पाहीले असता एका डुकरासह तिन लहान पिल्लं मेलेली तर दोन जिंवत असल्याचे दिसून आले. कामगारांनी ही बाब जागा मालक गैबी यांच्या कानावर घातली. गैबी यांनी सामाजिक कार्यकर्ते सत्यवान विचारे यांना कळवले. विचारे यांनी राजु पाटील, मज्जिद नेवरेकर, रफिक भोरे यांच्या सह जावून पाहणी केली असता, विहीरीत पाणी नसल्याने पिल्लांचा मृत्यृ झाल्याचे दिसून आले तर इतर डुकरेही पाण्याअभावी तडफडत असल्याचे पाहून प्रथम तेथील कामगारांच्या मदतीने विहीरीत पाणी टाकले. विहीरीत पाणी सोडताच डुकरे पाणी प्यायल्याने ताजी तवानी दिसू लागली. त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली.

माहीती मिळताच आरवली विभागाचे वनरक्षक धोत्रे घटना स्थळी दाखल झाले. तो पर्यंत अंधार पडल्याने सकाळ शिवाय डुकराला वाचविण्यासाठी उपाय करणे शक्य नव्हते. शनिवारी सकाळी वनरक्षक धोत्रे, सरपंच राजाराम विचारे, जय विचारे, ग्रामपंचायत शिपाई रवींद्र गुरव, रफीक भोरे आदींनी रस्सीच्या सहाय्याने डुकराला बाहेर काढल्याने तिला जीवदान मिळाले.