
सामना प्रतिनिधी । नाशिक
कानाचा टय़ुमर अर्थात ‘ग्लोमस जुगीलर’ या अत्यंत दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेल्या इजिप्तच्या महिलेवर अवघड व गुंतागुंतीची अशी शस्त्रक्रिया नाशिकच्या प्रख्यात कान, नाक, घसा तज्ञ डॉ. शब्बीर इंदोरवाला यांनी यशस्वी केली. या शस्त्रक्रियेला अकरा तास लागले. परदेशातील महिलेवर शस्त्रक्रिया करीत डॉ. इंदोरवाला यांनी हिंदुस्थानच्या वैद्यकीय क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीचा आपला आलेख अधिक उंचावला आहे. वाजवी दरात यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने या महिलेच्या चेहऱ्यावरही समाधान झळकत होते.
उत्तर महाराष्ट्रातील प्रख्यात कान, नाक, घसा तज्ञ डॉ. शब्बीर इंदोरवाला यांच्या कार्यशाळेत इजिप्तचे डॉ. अन्वर यांनी प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे डॉ. इंदोरवाला यांच्या वैद्यकीय सेवेबाबत त्यांना माहिती होती. इजिप्तच्या कैरो शहरातील हनिम फर्क ही 31वर्षीय महिला गेल्या काही महिन्यांपासून कानाचा ट्युमर अर्थात ‘ग्लोमस जुगीलर’ या दुर्मिळ आजाराने त्रस्त होत्या. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ही खूप खर्चिक व अवघड शस्त्रक्रिया करणे तिच्या आवाक्याबाहेरचे ठरत होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना यूएस किंवा ऑस्ट्रेलिया येथे जाण्याचा सल्ला दिल्याने त्या आणखी हतबल झाल्या. दरम्यान, डॉ. अन्वर यांनी त्यांना नाशिक येथे डॉ. शब्बीर इंदोरवाला यांच्याकडे शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मागील आठवड्यात हनिम या नाशिकमध्ये दाखल झाल्या. डॉ. इंदोरवाला यांच्याकडून त्यांनी उपचारपद्धती समजून घेतली. चार दिवसांपूर्वीच डॉ. इंदोरवाला यांनी 11 तासात त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी केली. या टिममध्ये डॉ. इंदोरवाला यांच्यासोबत भूलतज्ञ डॉ. नीलेश ततार, डॉ. अन्वर, डॉ. अबुजार इंदोरवाला, डॉ. सुदर्शन अहिरे व डॉ. गौरी महाजन यांचा सहभाग होता. शस्त्रक्रियेनंतर हनिम यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाली असून, त्या मायदेशी रवानाही झाल्या आहेत. या कामगिरीबद्दल डॉ. इंदोरवाला यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विश्वास सार्थ ठरविल्याचा आनंद
डॉ. शब्बीर इंदोरवाला यांनी याआधी हिंदुस्थानातील अनेक रुग्णांवर ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. प्रथमच परदेशातील महिला रुग्ण हिंदुस्थानात या शस्त्रक्रियेसाठी आली. त्यांच्यावर यशस्वी उपचार करून आपण परदेशातील डॉक्टर व रुग्णांचा विश्वास सार्थ ठरविला याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. इंदोरवाला यांनी दिली.
नाशिक मेडिकल टूरिझम व्हावे
विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी नाशिक येथे मेडिकल टूरिझम व्हावे, अशी अपेक्षा इंदोरवाला रुग्णालयाचे मुख्य प्रशासन अधिकारी युसूफ पंजाब यांनी व्यक्त केली.
































































