
‘नाटय़दर्पण रजनी’चे जनक सुधीर दामले यांचे आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. सुधीर दामले यांनी नाटय़दर्पण रजनीच्या माध्यमातून 25 वर्षे जणू सांस्कृतिक चळवळ चालवली. केवळ नाटय़ पुरस्कारच नव्हे तर नवनव्या कल्पक कार्यक्रमांनी आणि कलाविष्कारांनी त्यांनी ‘रजनी’ उत्तरोत्तर फुलवली. संपूर्ण नाटय़विश्वाला एकत्र आणण्याची किमया दामले यांनी करून दाखवली. त्यांच्या निधनाने नाटय़वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे.
गिरगावात राहणारे सुधीर दामले ‘नाटय़दर्पण’ मासिक चालवत होते. तसेच नाटय़दर्पणमार्फत ‘कल्पना एक, आविष्कार अनेक’ या एकांकिका स्पर्धेचे आयोजनही करायचे. हिंदी चित्रपटसृष्टीत फिल्मफेअर अॅवॉर्ड्सच्या धर्तीवर मराठी नाटय़सृष्टीतही असा सोहळा व्हावा ही संकल्पना प्रसिद्ध विनोदी अभिनेते गणेश सोळंकी यांनी सुधीर दामले यांना सुचवली. त्यातून नाटय़दर्पण रजनीचा जन्म झाला. ‘नाटय़दर्पण रजनी’चा पहिला कार्यक्रम 10 जुलै 1975 रोजी मुंबई मराठी साहित्य संघात पार पडला. हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. पुढे सलग 25 वर्षे नाटय़दर्पण रजनीने रसिकांच्या मनावर गारुड केले. नाटय़दर्पण रजनीचे कार्यक्रम रात्रभर चालायचे. हिंदी-मराठी मनोरंजन विश्वातील मोठमोठे तारके कार्यक्रमाला आवर्जून हजर राहायचे. अगदी पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, आशा भोसले, मोहन वाघ, सुनील गावसकर तसेच शशी कपूर, हेमामालिनी, आशा पारेख, उत्पल दत्त, गुलजार, शत्रुघ्न सिन्हा अशा अनेकांनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमाची तिकिटे मिळण्यासाठी रसिकांची धडपड असायची. 25 कार्यक्रम झाल्यानंतर नाटय़दर्पण रजनीवर पडदा पडला. अखेरचा कार्यक्रम रंगभवन येथे झाला. त्यानंतर सुधीर दामले आणि त्यांच्या पत्नी जयश्री दामले पुण्यात वास्तव्याला गेले.





























































