ऊसतोड मजुरांच्या संपाला हिंसक वळण, पाटोदाजवळ टेम्पो जाळला

राज्यभरात सुरू असलेल्या ऊसतोड मजुरांच्या संपाला आता हिंसक वळण लागत आहे. शुक्रवारी दुपारी चार ते पाचच्या दरम्यान संपकऱ्यांनी पैठण-पंढरपूर पालखी महामार्गावर तालुक्यातील अनपटवाडी शिवरात एका टेम्पोला आग लावून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

काय आहेत मागण्या?

ऊसतोड मजूर व वाहतूकदारांच्या वतीने विविध मागण्यांसाठी सध्या राज्यस्तरीय संप पुकारण्यात आलेला आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय कोयता हाती घेणार नाही, अशी भूमिका संपकऱ्यांच्या वतीने घेण्यात आली आहे. त्यासाठी विविध मुकादम व वाहतूकदारांच्या संघटना एकवटल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

दरम्यान, सध्या साखर कारखान्यांचे बॉयलर पेटल्याने गळीत हंगामासाठी विविध ठिकाणांहून ऊसतोड मजूर कारखान्यांकडे रवाना होत आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी संपकऱ्यांची भूमिका आहे. अशातच पाटोदा ढिगोळ हद्दीवरून पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे मजुरांची वाहने रवाना होत आहेत.

अनपटवाडी हे गाव पाटोदा ढिगोळ हद्दीलगत असून, याच भागातून मजुरांची वाहने जात होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी तालुक्यातील अनपटवाडी येथे पुसद येथून बारामती येथील कारखान्याकडे उसतोडणीसाठी मजूर घेऊन जाणारा टेम्पो (एमएच 11 एएल 3526) संतप्त झालेल्या संपकऱ्यांनी चालकाला खाली उतरवून पेटवून दिला, अशी माहिती समजली. त्यात टेम्पोचा पुढचा भाग पूर्णपणे जळाला आहे. या घटनेने संप चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या