राज्यात ऊस गळीत हंगामाची सांगता; साखरेचे उत्पादन 4.83 लाख टनांनी वाढले

प्रातिनिधिक फोटो

राज्यातील सहकारी व खासगी अशा एकूण 207 साखर कारखान्यांची धुराडे थांबल्याने, यंदाच्या गळीत हंगामाची अखेर अधिकृत सांगता झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत राज्यात साखरेचे उत्पादन 4.83 लाख टनांनी वाढले आहे. साखर कारखान्यांनी 1037.08 लाख टन उसाचे गाळप करून, 1101.7 लाख क्विंटल (110.17 लाख टन) साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा 10.27 टक्के आहे.

दरम्यान, 11.59 टक्के इतक्या मोठ्या उताऱ्याने 28 लाख टन साखर उत्पादन करत कोल्हापूर-सांगली जिल्ह्याने मागील वर्षीप्रमाणेच यंदाही अव्वल स्थान राखले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 10.26 टक्के असून, मागील वर्षी तो 9.0 टक्के होता. मागील गळीत हंगामात 211 साखर कारखान्यांनी 1055.32 लाख टन उसाचे गाळप करून 1053.41 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. ज्याचा सरासरी साखर उतारा 9.98 टक्के होता. साखर उत्पादनाच्या बाबतीत कोल्हापूर विभागाने 28.06 लाख टन साखरेचे उत्पादन करून अव्वलस्थान पटकावले आहे, तर किमान 3.27 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झालेला नागपूर विभाग शेवटच्या स्थानावर राहिला आहे.