अवती भवती – गॉगलची फॅशन

>> सुहास मळेकर

एकेकाळी डोळ्यांना गॉगल हीसुद्धा आमच्या गरीब वस्तीत मिजास समजली जात होती. अगदीच डोळे आले किंवा कुणाचं डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं असेल किंवा एखादा दृष्टिहीन असेल तर त्याला न चिडवता गॉगल घालण्याची मुभा होती. अन्यथा उगीच कुणी गॉगल घालून मिरवणारा दिसला तर त्याला चिडवून बेजार केले जाई असा तो काळ होता. गॉगल घातलेला हिरो फक्त चित्रपटात दिसे आणि प्रत्यक्षात गॉगल घालणारी उच्चभ्रू मंडळी आमच्यापासून कोसो दूर होती.

सणासुदीला जमतील तसे साधे तरी छान पारंपरिक कपडे घालून नातलगांच्या भेटीत आणि संगतीत आनंद सोहळा साजरा करण्याचा तो सुंदर काळ होता. एरव्ही साधे कपडेसुद्धा मिळवताना नाकीनऊ यायचे. मिळत नाहीत म्हणून अंगावर तेव्हा फाटके कपडे घालण्याची वेळ येई. फॅशन म्हणून साठ-सत्तर टक्के भाग कापलेली जीन्स एकाने घातलेली पाहिली नि तो जुना पन्नास वर्षांपूर्वीचा काळ आठवून हसू आलं. मुबलक असूनही फॅशन म्हणून असे फाटके का सुचत असावे, असा जेव्हा विचार मनात आला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली. पूर्वी सुंदर दिसण्यासाठी फॅशन केली जात होती आता आपण खूप बिझी आहोत हे दाखविण्यासाठी ती केली जाते.

थोडक्यात काय तर माणसाला नावीन्य हवं असतं. सुंदर दिसणे आता जुने झाले. आपण जगावेगळे आणि लक्षवेधी कसे दिसू याकडे आता कल आहे. आताच्या फॅशनची व्याख्या सांगायची झाली तर प्रचंड मेहनती माणसाच्या कपडय़ाची, पेहरावाची नक्कल म्हणजे फॅशन. मुख्यतः बरेचदा फॅशन्स युरोपातून आपल्याकडे येतात. युरोपियनांनी आपल्यावर पाडलेली छाप इथेही आपल्याला सहज लक्षात येईल. आपल्या इथल्या कष्टकऱयांची नक्कल कोणी करणार नाही, पण युरोपातल्या मेंढपाळापासून ते कारखान्यातल्या कामगारांपर्यंत कष्टकऱयांची महागडी नक्कल करणे आपल्याला इभ्रतीचे वाटते. तुम्ही बारकाईने पाहिले तर ते सहज लक्षात येईल.

रफटफ वावरण्यासाठी अगदी जाड कॉटनचे अथवा जीन्सचे कपडे कारखान्यांतून कामगारांनी वापरले. त्यात वस्तू सामावून घेण्यासाठी जॅकेट, रफटफ सिक्स पॉकेट कॉटनची पॅन्ट, पायांना कुठे इजा होऊ नये म्हणून नियमानुसार कामगारांना सक्तीचे दणदणीत शूज… हे सर्व आपल्या रोजच्या व्यवहारात अगदी सहज स्वीकारले गेले आणि ते फॅशन म्हणून नावारूपाला आले.

पुढच्या टप्प्यात अति श्रमांत वेळ मिळत नसल्याने किंवा परिस्थितीमुळे म्हणा कामगारांची अस्ताव्यस्त केस-दाढी वाढते, तसेच अस्ताव्यस्त दिसण्यासाठी नंतर रोजच्या जगण्यात अहमहमिका सुरू झाली. वेळेअभावी ठीकठाक करता येत नसल्यामुळे घाईने कसेतरी हात दुमडलेले जाडेभरडे डेनिमचे शर्ट कष्टकऱयांना ‘चलता है’ म्हणून ते तसेही फॅशन जगतात आले.

पुढे काय येईल याचं कुतूहल आहे. पूर्वी कधीकाळी गॉगलचा वापर सर्रासपणे होऊ लागला’ मध्यंतरी ब्लू-टूथ कानाला लावलेले रस्त्यावर सर्रास दिसू लागल्यावर कानाला श्रवणयंत्र लावलेले वरचेवर सुखावले. पूर्वी कधीतरी रस्त्यानं जाताना कोणी एकटाच हसत, कधी बडबडत जाताना दिसे तेव्हा त्याबद्दल सहानुभूती वाटे. आता तेही सर्रास दिसू लागले. बरं तुम्ही म्हणाल, ‘ती व्यक्ती मोबाईलवर बोलतेय हे नीटनेटक्या कपडय़ांवरून कळायला हवं’, पण आता तशीही सोय राहिलेली नाही.