सुलभ इंटरनॅशलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे मंगळवारी कार्डिअॅक अरेस्टने निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 80 वर्षांचे होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त सुलभ इंटरनॅशनलच्या कार्यालयात ध्वजारोहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान पाठक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली

डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्या जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. दलितांच्या सक्षमीकरणासाठी व समाज कल्याणासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. स्वच्छ हिंदुस्थान घडवणे हे त्यांचे ध्येय होते. त्यासाठी त्यांनी स्वच्छ भारत मोहिमेलाही पाठिंबा दिला होता. देशातील स्वच्छतेप्रती त्यांचे असलेले ध्येय हे कायम त्यांच्या बोलण्यातून दिसून यायचे. त्यांचे काम हे सदैव लोकांना प्रेरित करत राहिल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

– बिंदेश्वर पाठक यांनी 1970 साली सुलभ इंटरनॅशल सर्व्हिस संस्थेची स्थापना केली. डोक्यावरून मैला वाहून नेणाऱ्यांसाठी त्यांच्या संस्थेने देशभरात मोठे काम केले आहे. देशभरात जागोजागी त्यांच्या संस्थेने शौचालय बांधण्याचे काम केले आहे. देशभरात सुलभ इंटरनॅशनलचे तब्बल 850 शौचालय आहेत.

– बिंदेश्वर पाठक हे मूळचे बिहारमधील वैशाली जिल्ह्याचे रहिवासी होते. 1999 साली त्यांच्या कार्यासाठी केंद्र सरकाने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. 2003 साली जगभरातील 500 समाजसेवी लोकांच्या यादीत त्यांचे नाव होते.