नेत्यांना निवृत्तीचे वय नसते, राजकारण म्हणजे सरकारी नोकरी नव्हे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sumitra-mahajan

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजकारण आणि सरकारी नोकरी यांची तुलना केली जाऊ शकत नाही. सरकारी कर्मचाऱयाला ठरावीक काळानंतर निवृत्त व्हावे लागते. मात्र राजकीय नेत्यांचे तसे नसते असे परखड मत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी एका मुलाखतीत मांडले आहे. लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुमित्रा महाजन यांनी वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना तिकीट नाकारल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. याचदरम्यान सुमित्रा महाजन यांनी हे वक्तव्य केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. सुमित्रा महाजन मुलाखतीत म्हणाल्या की, राजकारणाची तुलना सरकारी नोकरीसोबत केली जाऊ शकत नाही.

सरकारी नोकरीमधील निवृत्तीचे वय आधीपासूनच ठरलेले असते, मात्र राजकारणात तसे होत नाही. कारण राजकीय नेता थेट जनतेच्या सुख-दुःखात सहभागी असतो. जनतेची सेवा करताना त्याला वेळेचे बंधन नसते असे त्यांनी सांगितले. मोरारजी देसाई हे वयाच्या 81 व्या वर्षी देशाचे पंतप्रधान झाले होते अशी आठवणही त्यांनी करून दिली.