सुनील छेत्रीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा, येत्या 6 जूनला कुवैतविरुद्ध खेळणार निरोपाचा सामना

हिंदुस्थानी फुटबॉल जगतावर आणि फुटबॉलप्रेमींच्या हृदयावर एकछत्र राज्य करणाऱया कर्णधार सुनील छेत्रीने आज आपली आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. हिंदुस्थानी फुटबॉलला आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मिळवून देण्यासाठी गेली 19 वर्षे धावाधाव करणारे हे पाय आता निवृत्ती पत्करणार आहेत. येत्या 6 जूनला कुवैतविरुद्ध खेळला जाणारा हा सामना छेत्रीचा निवृत्तीचा सामना असेल.

हिंदुस्थानी फुटबॉलप्रेमींसाठी मॅराडोनापेक्षा कमी नसलेल्या छेत्रीने आज आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवरून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कही खुशी कही गम असाच माहौल होता. त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱया चाहत्यांना त्याने अजून फुटबॉलसाठी खेळावे अशी मनापासून इच्छा होती तर काहींनी त्याच्या निर्णयाचा आदर ठेवत त्याच्या देदीप्यमान कारकीर्दीला मानाचा मुजरा ठोकला.

2005 साली सुनीलने वयाच्या 19 व्या वर्षी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्याच्याच कारकीर्दीत आणि त्याच्याच धडाकेबाज खेळामुळे हिंदुस्थानात फुटबॉलची व्रेझ प्रचंड वाढली. त्याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या कामगिरीत दिवसेंदिवस प्रगतीच होत होती. गेली 19 वर्षे आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणाऱया छेत्री 94 आंतरराष्ट्रीय गोल केलेत. त्याचे शतक 6 गोलांनी हुकलेय. हिंदुस्थान जागतिक फुटबॉलच्या नकाशावर अजूनही खूप मागे असला तरी हिंदुस्थानचा हा फुटबॉलपटू जागतिक फुटबॉलपटूंच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. छेत्रीपेक्षा अधिक गोल फक्त ख्रिस्तिआनो रोनाल्डो (128), अली डेई (108) आणि लिओनल मेस्सी (106) यांनीच छेत्रीपेक्षा अधिक गोल ठोकले आहेत. तसेच सध्या खेळत असलेल्या फुटबॉलपटूंमध्ये तो तिसऱया स्थानावर आहे. अली डेई 2006 सालीच निवृत्त झाला आहे, मात्र रोनाल्डो आणि मेस्सी हे महान फुटबॉलपटू अजूनही खेळत आहेत. हिंदुस्थानच्या या महान खेळाडूला 2011 साली ‘अर्जुन’ पुरस्कार तर 2019 साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

मेस्सीलाही मागे टाकले होते छेत्रीने

कुणाला याची कल्पनाही नसेल, पण आपल्या सुपरस्टार छेत्रीने फुटबॉल किंग लिओनल मेस्सीलाही गोलांच्या बाबतीत मागे टाकले होते. 60 ते 80 गोलांच्या दरम्यान छेत्री आणि मेस्सी यांच्यात जोरदार चढाओढ पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर छेत्री मागे पडला. गेल्या काही वर्षांत छेत्री फार आंतरराष्ट्रीय गोल करू न शकल्यामुळे मेस्सी त्याच्या पुढे निघाला. फिफा वर्ल्ड कप आणि काही मैत्रीपूर्ण लढती खेळल्यामुळे मेस्सीने आपल्या गोलांचे शतक साजरे केले.

आता नव्या खेळाडूंना संधी द्यायची वेळ आली

सुनील छेत्री आजही हिंदुस्थानचा नंबर वन फुटबॉलपटू आहे आणि सर्वात फिट खेळाडूही आहे. 39 वर्षीय खेळाडूने हिंदुस्थानला आशियाई फुटबॉलमध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी गेली 19 वर्षे जोरदार खेळ केला आहे. हिंदुस्थानी फुटबॉल संघ फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र व्हावा हेच त्याचे ध्येय होते. पण ते त्याच्या कारकीर्दीत पूर्ण होऊ शकले नाही. मात्र त्याच्या खेळाने हिंदुस्थानात फुटबॉलची क्रांती झालीय. फुटबॉलला चांगले दिवस आलेत. त्यामुळे आता नव्या खेळाडूंना संधी मिळावी म्हणून हिंदुस्थानच्या फुटबॉलला अलविदा करण्याचा निर्णय छेत्रीने घेतला. हिंदुस्थानसाठी 150 सामने खेळणाऱया छेत्रीने एक खेळाडू आणि एक कर्णधार म्हणून सोनेरी इतिहास लिहीलाय. त्याने निवृत्तीची घोषणा करताना आपल्या खडतर प्रवासाचीही आठवण काढली. मला माझा पहिला सामना कुठे खेळलो होतो ते आजही चांगले आठवतेय. माझा पहिला सामना, पहिला गोल माझ्या कारकीर्दीतला सर्वात आवडता क्षण आहे. मी देशासाठी इतकी वर्षे आणि इतके सामने खेळेन, असा कधीही विचार केला नव्हता. मी जेव्हा निवृत्तीचा निर्णय घेतला तेव्हा सर्वप्रथम माझे आई-बाबा आणि माझ्या पत्नीला सांगितले.

कॉलेज अॅडमिशनसाठी फुटबॉलकडे वळवली पावले

सुनील छेत्री हा अपघाताने फुटबॉलपटू बनला. बालपणी अत्यंत मस्तीखोर असलेल्या सुनीलला फुटबॉल खेळणे आवडतही नव्हते. मात्र चांगल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळावे म्हणून त्याने फुटबॉल खेळाची निवड केली. त्याच्या नशिबात काही वेगळेच लिहिलं होतं. त्याचे फुटबॉल खेळणे कधी उदरनिर्वाहाचे साधन बनले हे त्याच्या बाबांनाही कळले नाही. छेत्रीचे सैनिक असलेल्या वडिलांना अर्थातच खारगा छेत्री यांना नेहमीच वाटत होते की, आपला मुलगा एक चांगला फुटबॉलपटू म्हणून घडावा. जे आपण मिळवू शकलो नाही ते सर्व आपल्या मुलाने मिळवावं. दिल्लीत सुनीलने आपल्या फुटबॉलची बाराखडी शिकायला सुरुवात केली आणि 2001-02 साली तो सिटी क्लबशी जोडला गेला. यानंतर 2002 साली तो मोहान बागान या लोकप्रिय क्लबकडून खेळू लागला आणि हिंदुस्थानी फुटबॉलला एक सुपरस्टार मिळाला. यानंतर जे काही घडलं ते गेली दोन दशके प्रत्येक हिंदुस्थानी फुटबॉलप्रेमींनी अनुभवलेय.

छेत्रीच्या निवृत्तीमुळे हिंदुस्थानी फुटबॉलची प्रचंड हानी

यात कोणतीही शंका नाही, सुनील छेत्री एक महान फुटबॉलपटू आहे. हिंदुस्थानी फुटबॉलसाठी त्याचे प्रचंड योगदान आहे. त्याची निवृत्ती हिंदुस्थानी फुटबॉलसाठी खूप मोठे नुकसान आहे. मी भाग्यशाली आहे की मी त्याच्याबरोबर सीनियर म्हणून खेळलो. – बायचुंग भुतिया, आांतरराष्ट्रीय फुटबॉलपटू

आपली कारकीर्द असामान्य आहे. आपण हिंदुस्थानी फुटबॉलसाठी आणि हिंदुस्थानी खेळांसाठी एक अभूतपूर्व आयडॉल राहिला आहात. – बीसीसीआय

आपल्या मैदानातल्या आणि बाहेरच्या कर्तृत्वाला अवघा हिंदुस्थान सदैव आठवणीत ठेवेल. आपण नेहमीच आमच्यासाठी प्रेरणास्रोत राहिला आहात आणि पुढेही असाल. – अखिल हिंदुस्थानी फुटबॉल महासंघ

क्रिकेट जगतानेही मानले आभार

सुनील छेत्री हिंदुस्थानी क्रिकेटपटूंचाही मित्र होता. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर त्याच्या कारकीर्दीला सलाम ठोकणारे अनेक संदेश सोशल मीडियावर देण्यात आले. विराट कोहलीने ‘माझ्या भावा, मला तुझा अभिमान आहे,’ अशा शब्दांत त्याच्या कारकीर्दीचे काwतुक केले. तसेच युझवेंद्र चहल, कुलदीप यादवसह अनेक दिग्गजांनीही सुनीलचे आभार मानले.

सिकंदराबादमध्ये सुनीलचा जन्म

आंध्र प्रदेशच्या सिकंदराबाद शहरात 3 ऑगस्ट 1984 साली सुनील छेत्रीचा जन्म झाला. त्याचे आई-बाबा दोघेही फुटबॉलपटू असल्यामुळे त्याच्यावरही फुटबॉल खेळण्याचे दडपण होते. 2011 साली बायचुंग भुतियाच्या निवृत्तीनंतर तत्कालीन प्रशिक्षक बॉब हटन यांनी छेत्रीच्या खांद्यावर हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व सोपवले आणि त्याचे सारे आयुष्य बदलले. कारकीर्दीच्या प्रारंभी छेत्रीला भुतियाचेच मार्गदर्शन लाभले. मात्र भुतियाच्या निवृत्तीनंतर छेत्रीने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले. गेल्या दशकात हिंदुस्थानी फुटबॉल क्षेत्रात अनेक खेळाडू उदयास आले, पण त्यातून ना एक भुतिया जन्माला आला ना एक छेत्री.