
हिंदुस्थानी फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये एक नवा पराक्रम साकारला आहे. छेत्री आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. छेत्रीने मंगळवार, 14 जूनला हाँगकाँगविरोधात एएफसी आशियाई कपच्या पात्रता सामन्यात हा विक्रम केला. या सामन्यात सुनील छेत्रीने 84 वा गोल केला. यासोबतच त्याने रिअल माद्रिदचे दिग्गज आणि हंगेरीचे फुटबॉलपटू फेरेंक यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. छेत्रीने याआधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘फुटबॉलचे जादूगार’ म्हणून ओळखले जाणारे पेले यांना मागे टाकले आहे.
‘हिंदुस्थानी गोल मशीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱया सुनील छेत्रीने याआधी ऑक्टोबर 2021 मध्ये पेले यांच्या 77 गोलचा रेकॉर्ड मोडला होता. छेत्री सध्या खेळात असणाऱया आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंत फक्त रोनाल्डो आणि मेस्सीच्या मागे असून सर्वाधिक गोलच्या बाबतीत यादीत तिसऱया क्रमांकावर आहे. सुपरस्टार मेस्सीपेक्षा छेत्री आता 2 गोलने मागे आहे.
37 वर्षीय सुनील छेत्रीने 2005 मध्ये हिंदुस्थानी संघातून आंतरराष्ट्रीय फुटबॉल लक्षेत्रात पदार्पण साजरे केले होते. तेव्हापासून त्याच्या पायाला आराम नाहीय. त्याने 129 लढतींत हिंदुस्थानसाठी 84 गोल नोंदवले आहेत. 2011 हे सुनीलचे सोनियाचे वर्ष ठरले होते. कारण या वर्षात त्याने एकूण 13 गोलची नोंद केली होती.
एएफसी आशिया चषक पात्रता स्पर्धेत सुनीलचे 4 गोल
सुनील छेत्री लवकरच मेस्सीलाही मागे टाकेल अशी हिंदुस्थानी फुटबॉल चाहत्यांना आशा आहे. हिंदुस्थानी फुटबॉल संघाने कोलकातामध्ये 14 जूनला एएफसी आशियाई कपच्या पात्रता सामन्यात हाँगकाँग संघाला 4-0 ने धूळ चारली. हिंदुस्थान या सामन्याआधीच एएफसी आशियाई कप 2023 साठी पात्र ठरला होता. हाँगकाँगविरुद्ध हिंदुस्थानकडून अन्वर अली, सुनील छेत्री, मानवीर सिंह आणि इशान पंडिता यांनी गोल केले. हिंदुस्थानने पंबोडियाचा 2-0 ने पराभव करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली होती. या सामन्यात दोन्ही गोल सुनील छेत्रीने केले होते. दुसऱया सामन्यात हिंदुस्थानी कर्णधाराने अफगाणिस्तानविरुद्ध एक गोल करत विजयाचा पाया रचला होता. एएफसी आशिया कपच्या पात्रता फेरीत छेत्रीने 4 गोल नोंदवले आहेत.
सर्वाधिक गोल नोंदवणारे फुटबॉल स्टार
1) ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) 117 गोल
2) अली दायेगी (ईराण) 109 गोल
3) मोख्तार डाहारी (मलेशिया) 89 गोल
4) लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) 86 गोल
5) फेरेंक पुस्का (हंगेरी) 84 गोल
6) सुनील छेत्री (हिंदुस्थान) 84 गोल


























































