
हिंदुस्थानी क्रिकेट टीमचे माजी क्रिकेटपटू लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्या कसोटी पदार्पणाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वतीने त्यांचा 29 ऑक्टोबरला गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आयसीसीचे माजी अध्यक्ष, खासदार शरद पवार उपस्थित राहणार असून या दोघांच्या उपस्थितीत गावसकर यांच्याबरोबरच माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या नावाने वानखेडे स्टेडियमवर एका स्टँडचे उद्घाटन करून त्यांनाही गौरविण्यात येणार आहे.
एमसीए कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. टी-20 मुंबई लीगच्या गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर विशेष निमंत्रित म्हणून या बैठकीला उपस्थित होते. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांचेही मुंबई क्रिकेट आणि एमसीएशी जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यामुळे या महान खेळाडूंचा गौरव करण्यासाठी या दोन प्रमुख नेत्यांना एकत्र बोलावता येऊ शकते या नार्वेकर यांनी मांडलेल्या प्रस्तावाला एकमताने अनुमोदन मिळाल्याचे समजते. याबरोबरच माजी कर्णधार गुंडाप्पा विश्वनाथ आणि सचिन तेंडुलकर हे दोघेही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने माजी अध्यक्ष माधव मंत्री यांच्या स्मरणार्थ क्रिकेट व्याख्यानाची परंपराही सुरू करण्यात येणार आहे. पहिले व्याख्यान देण्याचा मान सुनील गावसकर यांना देण्यात आला आहे.
1971 साली झाले होते गावसकर यांचे कसोटी पदार्पण
सुनील गावसकर यांनी 1971 सालच्या वेस्ट इंडीज दौऱ्यात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी 16 वर्षांच्या कारकीर्दीत 125 कसोटी सामन्यांमध्ये 34 शतके आणि 45 अर्धशतकांसह 10,122 धावांचा, तर 108 वन डे सामन्यांमध्ये एक शतक आणि 27 अर्धशतकांसह 3092 धावांचा रतीब घातला. दिलीप वेंगसरकर यांनी 116 कसोटी सामन्यांमध्ये 17 शतके आणि 35 अर्धशतकांसह 6868 धावा फटकावल्या आहेत. तसेच 129 वन डे सामन्यांमध्ये त्यांच्या नावावर एक शतक आणि 23 अर्धशतकांसह 3508 धावा आहेत.





























































