लष्करे खूनप्रकरणात पाचजणांची जन्मठेप कायम; छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचा निकाल

शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य अण्णा लष्करे हत्येच्या गुह्यामधील आरोपींनी छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठात दाखल केलेल्या चार अपिलांची एकत्रित सुनावणी घेण्यात आली. यामध्ये राजू जहागीरदारसह सहापैकी पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय यांनी दिलेली सश्रम कारावास व जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवत एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

सुनील उर्फ अण्णा लष्करे यांची 18 मे 2011 रोजी हत्या झाली होती. या गुह्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायालय छत्रपती संभाजीनगर यांनी सेशन केस क्रमांक 376/2011 या केसमध्ये आरोपी राजू गुलाब शेख उर्फ राज जहागीरदार, सय्यद सरफराज अब्दुल कादर, शेख एजाज उर्फ मुन्ना जहागीरदार, शेख जावेद उर्फ पेंटर, मुनीर उर्फ मुन्ना पठाण, शेख मुस्ताक अहमद गुलाम रसूल या सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

त्यावर या आरोपीने उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे 1) अपील क्र. 651/2014 सय्यद सरफराज अब्दुल कादर विरुद्ध सरकार, 2)अपील क्र. 238/2015 शेख एजाज उर्फ मुन्ना जहागीरदार विरुद्ध सरकार, 3)अपील क्र.717/2014 शेख राजू उर्फ राजू जागीरदार विरुद्ध सरकार, 4)अपील क्र.653/2014 शेख मुस्ताक अहमद गुलाम रसूल विरुद्ध सरकार असे वेगवेगळे अपील दाखल केले होते. त्यामध्ये उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथील न्यायमूर्ती आर. जी. अवचट व आर. एम. जोशी यांच्या पीठाने सदर चारही अपील प्रकरणाची एकत्रित सुनावणी घेऊन एकत्रित निकाल दिला. त्यामध्ये सहापैकी पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय यांनी दिलेली सश्रम कारावास व जन्मठेप कायम ठेवत एका आरोपीला निर्दोष मुक्त केले.

या गुह्यातील कटामागचा सूत्रधार  राजू जहागीरदार यास उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर केलेला होता.  त्यास उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर तत्काळ हजर होण्याचे आदेश दिल्याने त्याला आता तुरुंगामध्ये जावे लागणार आहे.

जिल्हा व सत्र न्यायालयातील दिलेल्या साक्ष व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पूजा लष्करे व मनोज धोत्रे नोंदविलेली साक्ष, सरकारी पंच, ओळख परेड, पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, डॉक्टरांची साक्ष तसेच फॉरेन्सिक रिपोर्ट, मोबाईल टॉवर लोकेशन, कॉल डिटेल्स व सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकालांचे निवाडे यांच्या आधारे पाच आरोपींना सत्र न्यायालयाने दिलेली सदरची शिक्षा कायम ठेवली. शेख  रसूल याला ओळख परेडच्या वेळी हजर का केले नाही याचे सबळ कारण न दिल्यामुळे व साक्षीदार मनोज धोत्रे यांनी इतर तीनच आरोपी ओळख परेड व घटनास्थळी होते अशी साक्ष दिल्याने सबळ पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने सर्व साक्षीपूर्व आधारे मयत लष्करेचा मृत्यू हा अपघातातून नव्हे तर पूर्वनियोजित कटाप्रमाणे केलेली नियोजनबद्ध हत्या होती, असे मत नोंदवत पाच आरोपींना  शिक्षा कायम ठेवली आहे.  मयत लष्करे यांच्या वतीने ऍड. सुनील चावरे यांनी काम पाहिले.