
गदर 2 या चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत असलेल्या अभिनेता आणि भाजपा खासदार सनी देओल यांच्या जुहू येथील ‘सनी व्हीला’ या बंगल्याचा लिलाव होणार असं वृत्त रविवारी प्रसारित झालं होतं. बँक ऑफ बडोदाने हा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याबाबतची जाहिरातही बँकेने प्रसिद्ध केली. मात्र, आता हा लिलाव होणार नसल्याचं वृत्त आहे.
सनी देओल यांनी या बँकेकडून 56 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी बंगला तारण ठेवला होता. मात्र, कर्जाचे हप्ते काही काळापासून थकल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. 25 सप्टेंबर रोजी ऑनलाइन माध्यमातून या बंगल्याचा लिलाव होणार होता. गुरुदासपूरचे खासदार सनी देओल यांनी 55.99 कोटींचे कर्ज घेतले होते.
रविवारी बँकेने प्रसिद्धी पत्रक जारी केले. त्यानुसार जुहू येथील गांधीग्राम रोडवरील सनी व्हीला हा बंगला ताब्यात घेण्यात आला असून बंगल्याच्या लिलावाची किंमत 51.43 कोटी रुपये ठेवण्यात आली होती. मात्र, आता हा लिलाव होणार नसून बँक ऑफ बडोदाने लिलाव करण्याची नोटीस परत घेतली आहे.


























































