
आगामी आयसीसी वन डे वर्ल्ड कपचा नववा संघ म्हणून श्रीलंकेला स्थान लाभले आहे. आता दहाव्या आणि अखेरच्या जागेसाठी झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यात वर्ल्ड कप पात्रता फेरीत सुपर सिक्सचा सामना होणार असून जो संघ जिंकेल त्याला वर्ल्ड कपचे तिकीट मिळणार आहे. झिम्बाब्वे संघ पात्र ठरण्याची शक्यता अधिक असली तरी स्कॉटलंडने वेस्ट इंडीजचा पराभव करत त्यांना स्पर्धेबाहेर फेकण्याची करामत दाखवली होती. त्यामुळे स्कॉटलंडने झिम्बाब्वेला हरवण्यात यश मिळविले तर स्कॉटलंड चौथ्यांदा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरेल. याआधी 1999, 2007 आणि 2015 च्या वर्ल्ड कपमध्येही स्कॉटलंड सहभागी झाला होता.
सलग 9 स्पर्धा खेळल्यानंतर 2019 साली वर्ल्ड कपमध्ये प्रथमच झिम्बाब्वेचा संघ अपात्र ठरला होता, मात्र यंदा त्यांनी वर्ल्ड कपमध्ये पुनरागमन करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे. या पात्रता फेरीत श्रीलंकेनंतर सर्वोत्तम कामगिरी करणारा झिम्बाब्वेचाच संघ आहे. त्यामुळे ते स्कॉटलंडला हरवून हिंदुस्थान गाठण्याची तयारीही केली आहे. झिम्बाब्वेच्या सीन एरव्हिनने स्पर्धेत स्वप्नवत कामगिरी करताना 118 च्या सरासरीने 588 धावा केल्या आहेत. उद्याही त्याच्या बॅटीतून धावांचा पाऊस कोसळला तर झिम्बाब्वेला कुणीही रोखू शकत नाही.





























































