
छोटय़ा पडद्यावरची प्रेमळ आई अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर सोनीवरील ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी – नयी कहानी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. यात त्या ईश्वरी नावाची व्यक्तिरेखा साकारतायत. पडद्यावर आई साकारताना आणि प्रत्यक्षात मातृत्वाचा अनुभव घेताना काय वाटते, याबद्दल सुप्रिया म्हणाल्या, खऱ्या आयुष्यात मलाही एक मुलगी आहे. तिच्या बाबतीत मी खूप प्रोटेक्टिव्ह आहे. ती जे निर्णय घेते, त्यावर मी पूर्णपणे विश्वास ठेवते आणि तिला पाठिंबा देते. तिने आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे हे पाहताना मला खूप समाधान वाटते. ईश्वरी या भूमिकेबाबत त्या म्हणाल्या, एक आई म्हणून ईश्वरी आपल्या मुलांवर सारखेच प्रेम करते, पण देवकडे (शहीर शेख) तिचा विशेष कल आहे. आपल्या आणि आपल्या मुलाच्या नात्यात ती कोणालाच येऊ देत नाही. माझ्या मते, प्रेम आणि काळजी दाखवण्याची प्रत्येक आईची आपली खास पद्धत असते.


























































