अयोध्येतील आठ कॉलेजमध्ये उभारले तुरुंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ऐतिहासिक अयोध्या खटल्याच्या निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. या निकालानंतर हिंसक घटना घडल्यास त्यातील दंगेखोरांना वेळीच डांबण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी अयोध्येशेजारील आंबेडकर नगर येथील कॉलेजमध्ये 8 तुरुंग बनवले आहेत. 1992 च्या दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात पुरेपूर खबरदारी घेतली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी तत्काळ सुनावणीची प्रकरणे नवनियुक्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याकडे सोपवली आहेत. यात अयोध्येसह राफेल खरेदी, शबरीमाला, सरन्यायाधीशांचे कार्यालय आरटीआयच्या कक्षेत आणण्याची मागणी करणारा खटला ही प्रकरणे आहेत. सरन्यायाधीश गोगोई यांच्या या भूमिकेमुळे अयोध्येचा निकाल एक-दोन दिवसांतच लागण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला असून अयोध्येत 10 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. राज्यात निमलष्करी दलाचे 4 हजार जवान तैनात आहेत. अयोध्या जिह्याचे रेड, यलो, ग्रीन आणि ब्ल्यू असे चार विभाग पाडण्यात आले असून त्यात 48 सेक्टर बनवले आहेत. एका आदेशावर अयोध्या बंद केली जाऊ शकते अशी सुरक्षा व्यवस्था ठेवली गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

सर्व राज्यांना दक्षतेच्या गृहमंत्रालयाच्या सूचना

अयोध्येच्या निकालाला राजकीय, धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अधिक महत्त्व आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्वच राज्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करून सुरक्षेबाबत योग्य ती दक्षता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. संवेदनशील भागांत पुरेसा बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

स्थानिकांची खबरदारी

  • स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेकांनी आपल्या घरातील महिला व मुलाबाळांना सुरक्षित ठिकाणी मुक्कामाला नेऊन ठेवले आहे.
  • काही कुटुंबांनी खाण्यापिण्याचे व इतर सामान घरात जमा करून ठेवण्याची लगबग सुरू केली आहे.
  • काहींनी लग्नाचे मुहूर्त पुढे ढकलले तर काहीजण दुसऱया राज्यात लग्नासाठी हॉलचा शोध घेऊ लागले आहेत.

प्रशासनाची तयारी

  • जिल्हा प्रशासनाने हिंदू-मुस्लिमांसह विविध समाजांच्या प्रतिनिधींसोबत बैठका घेऊन निकालानंतरही शांतता कायम राखण्याचे आवाहन केले आहे.
  • सोशल मीडियातून भडकावू पोस्ट व्हायरल होऊ नयेत म्हणून राज्यभरात 16 हजार स्वयंसेवकांची टीम कार्यरत ठेवली आहे.
  • सुमारे 15 लाख भाविकांची हजेरी लागणाऱया पंचकोसी परिक्रमेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राममंदिरसाठी दगड घडवण्याचे काम बंद

राममंदिरसाठी 1990 पासून सुरू केलेले दगड घडवण्याचे काम अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच बंद करण्याचा निर्णय विश्व हिंदू परिषदेने घेतला आहे. दगड घडवणाऱया कामगारांना त्यांच्या घरी पाठवल्याची माहिती परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी गुरुवारी दिली. आतापर्यंत 1.25 लाख क्युबिक फूट दगड घडवण्यात आले असून ते राममंदिरच्या पहिल्या माळ्यासाठी पुरेसे असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.