बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सकाळी जोरदार दणका दिला आणि भाजप ताळ्यावर आले. महाराष्ट्रात बुधवारी सायंकाळी 5पर्यंत बहुमत चाचणी घ्या, गुप्त मतदान नको, मतदानाचे लाइव्ह प्रक्षेपण करा, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आणि भाजपचा घोडेबाजार थांबला.

सोमवारी दीड तास सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. देवेंद्र फडणवीस सरकारवरील विश्वास संमतीची तारीख लवकरात लवकर निश्चित करावी, अशी मागणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. आज न्यायमूर्ती रमन्ना यांच्या खंडपीठाने भाजपला दणका दिला.

न्यायालयाने काय म्हटले?

  • बुधवारी सायंकाळी 5 पर्यंत आमदारांच्या शपथविधीनंतर बहुमत चाचणी घ्यावी.
  • हंगामी अध्यक्षांची निवड या प्रक्रियेसाठी केली जावी.
  • बहुमत चाचणीसाठी गुप्त मतदान नको. बहुमत चाचणी प्रक्रियेचे थेट लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावे आणि हंगामी अध्यक्षच बहुमत चाचणी घेतील.
  • लोकशाही मूल्यांचे रक्षण झाले पाहिजे.

दिवसभरात काय घडले…

  • सकाळी 10.42 – महाराष्ट्रात 27 नोव्हेंबरला बहुमत चाचणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
  • 11.00 – शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी
  • दुपारी 1.18 – भाजपच्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईत पोहचण्याच्या सूचना
  • 2.17 – काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक, बाळासाहेब थोरात यांच्या नावावर विधिमंडळ गटनेता म्हणून शिक्कामोर्तब
  • 2.45 – पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची दिल्लीत बैठक
  • 3.00 – अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
  • 3.30 – देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा
  • 3.44 – राजभवनावर जाऊन फडणवीस यांचा राजीनामा सादर
  • संध्याकाळी 6.30 – शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस विधिमंडळाची हॉटेल ट्रायडंट येथे संयुक्त बैठक
  • 7.00 – महाराष्ट्र विकास आघाडीची घोषणा
  • रात्री 8.00 – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतेपदी निवड
  • 9.15 – महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीला, सत्तास्थापनेचा दावा
  • 9.22 – अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीला सिल्वर ओकवर दाखल
  • 9.39  गरवारे क्लबमध्ये भाजप विधिमंडळाची बैठक