
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सीबीआय आणि पश्चिम बंगाल सरकार वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून राजीव कुमार यांनी सहकार्य करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. राजीव कुमार यांना अटक करण्यात येऊ नये असंही या आदेशांमध्ये म्हटलं आहे. त्यानुसार राजीव कुमार यांनी 20 फेब्रुवारी रोजी हजर होण्याचे आदेश देण्यात सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
शारदा चिटफंड आणि रोझ व्हॅली घोटाळ्याचे तपासप्रमुख कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार आहेत. राजीव कुमार यांनी महत्त्वाचे कागदपत्रे गहाळ केली, पुरावे नष्ट केले, असा आरोप करीत सीबीआयने त्यांना नोटीस बजावली होती. मात्र, राजीव कुमार सीबीआय कार्यालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे रविवारी सीबीआयचे पथक राजीव कुमार यांच्या निवासस्थानी धडकले; यावेळी पोलिसांनी या पथकाला अडविले. पोलीस अधिकारी आणि सीबीआय अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पवित्रा घेत मोदी सरकारकडून सीबीआयला हाताशी धरून विरोधी पक्षांच्या सरकारांवर दडपशाही केली जात आहे, असा आरोप केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेला अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.
त्यामुळे मोदी सरकारविरुद्ध रविवारपासून ममता बॅनर्जी यांनी मेट्रो चॅनल स्टेशन येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. 8 फेब्रुवारीपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. रविवार रात्रीपासून तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते, कार्यकर्ते येथे येत आहेत. ‘‘रविवारपासूनचे धरणे आंदोलन 8 फेब्रुवारीपर्यंत सुरूच राहील़ माझे प्राण गेले तरी बेहत्तर; पण आता मागे हटणार नाही, तडजोड करणार नाही’’, असा आक्रमक पवित्रा घेत ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.


























































