TVK Vijay Rally Stampede – विजयच्या रॅलीतील चेंगराचेंगरीची CBI चौकशी होणार, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

तामीळ सुपरस्टार थलपती विजयच्या पक्षाच्या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरीत 41 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती जे.के महेश्वरी आणि न्यायमूर्ती एन. व्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले असून ही समिती सीबीआयचा तपास पारदर्शक व निष्पक्षपणे पार पडेल यावर लक्ष ठेवेल.

विजयच्या तमिलगा वेट्री कळघम (टीव्हीके) पक्षाने शनिवारी करूर येथे एका जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. विजयचे भाषण सुरू असताना गर्दी हाताबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी सुरू झाली. याच दरम्यान एक 9 वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याचे समोर आल्याने विजयने कार्यकर्त्यांना तिचा शोध घेण्याचे आवाहन केले. मात्र गर्दी सैरभर झाली आणि यात अडकल्याने अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे विजयने भाषण थांबवले आणि गर्दीला शांततेचे आवाहन करत त्याने तिथून काढता पाय घेतला.

उच्च न्यायालयाने नाकारलेली CBI चौकशीची मागणी

याआधी मद्रास उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीच्या आदेशाची याचिका फेटाळून लावली होती. यावेळी न्यायालयाने ‘याचिकाकर्ता राजकारणी आहे त्यामुळे न्यायालयाला राजकीय आखाडा बनवू नये’ असे न्यायालयाने सांगितले होते.