आधी कोर्टापुढे शरण या, नंतर जामिनासाठी अर्ज करा, सर्वोच्च न्यायालयाचा भाजप आमदार जयकुमार गोरे यांना दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जमिनीची खोटी कागदपत्रे बनवून घोटाळा केल्याप्रकरणी भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावला. त्याचबरोबर आधी वडूज सत्र न्यायालयासमोर हजर व्हा आणि नंतरच जामिनासाठी अर्ज करा, असा सक्त आदेशही न्यायालयाने दिला आहे.

साताऱ्यातील माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह एकूण 6 जणांवर मायणी गावातील जमिनीबाबत खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महादेव भिसे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात दहिवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात जमिनीची खोटी कागदपत्रे बनवण्यात तलाठीदेखील आरोपी आहे. हा आरोपी तलाठी सध्या फरार आहे. या प्रकरणात आतापर्यंत आरोपी संजय काटकर लाला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, गोरे यांनी वडूज न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने गोरे यांनी आधी मुंबई उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.