
तुमच्याविरोधात एखादा आदेश देण्याची तुमची इच्छा आहे का? या याचिका केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात आल्या आहेत. जबाबदारीने वागा, थोडी तरी संवेदनशीलता बाळगा. अशाप्रकारे असंवेदनशीलता दाखवत याचिका करू नका, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारला निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
आम्ही तुम्हाला यापूर्वीच सुनावणीदरम्यान सल्ला दिला होता की, कृपया असे करू नका. तुमचा नेमका हेतू काय? तुम्हाला या जनहित याचिका कुणी दाखल करण्यास सांगितल्या, तुम्ही संवेदनशीलता दाखवू शकत नाही का, तुमची काही जबाबदारी नाही का… अशा शब्दांत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला फटकारले. पहिल्यांदा पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही याचिका केल्याचे वकिलांनी सांगितले. मात्र, न्यायालयाने असे करू नका, जबाबदारीने वागा असे सांगत याचिका फेटाळून लावली.