भटका कुत्रा चावल्यास भरपाई मिळणार; सुप्रीम कोर्ट सरकारला आदेश देणार

भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेण्याचे प्रकार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला भरपाईबाबत आदेश देण्याच्या तयारीत आहे. कुत्र्याने चावा घेतल्याच्या प्रत्येक घटनेत पीडित व्यक्तीला भरपाई देण्याबाबत सरकारला आदेश देणार आहोत, असे न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. जे लोक कुत्र्यांना खायला देतात, त्यांचीही जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही न्यायालयाने सुनावणीवेळी नमूद केले. न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.

आता कुत्र्यांच्या हल्ल्याची जबाबदारी केवळ सरकारी अधिकाऱ्यांवरच नाही तर त्यांना खायला घालणाऱ्यांवरही निश्चित केली जाईल, असे खंडपीठ म्हणाले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय पुढील सुनावणी 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता घेणार आहे.

रुग्णालये, रेल्वे स्थानके, बस डेपो आणि शैक्षणिक संस्था यासारख्या सार्वजनिक ठिकाणांचा वापर कुत्र्यांसाठी निवारा म्हणून करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ही ठिकाणे कुत्र्यांसाठी अनुकूल असल्याचा जे दावा करतात त्यांनी हे प्राणी घरी घेऊन जावेत, अशा कडक शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने श्वानप्रेमींना सुनावले.