
भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा पदावनती केली. भाजपच्या दिल्ली दरबारात फडणवीस यांचा पर्यायाने एका मराठी माणसाचा पदोपदी अपमान केला जात आहे. त्यामुळे मला वाईट वाटतं, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी पवार शैलीत भाजपला टोला लगावला.
शेतकरी आक्रोश मोर्चाच्या आज तिसऱया दिवशी खासदार सुळे या विविध ठिकाणी झालेल्या सभांमध्ये सहभागी झाल्या. या वेळी डोक्यावर भाजीपाल्याची टोपली घेऊन सरकारचा जाहीर निषेध केला. फडणवीस यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. दुर्दैवाने आता भाजपचं सरकार असूनही ते मुख्यमंत्री पदी कायम राहिले नाहीत. त्यांना फारसे अधिकारही दिले जात नाहीत. महाराष्ट्रातला एक कर्तृत्ववान नेता मोठा झाला, मुख्यमंत्री झाला. परंतु भाजपने त्यांना आता उपमुख्यमंत्री केलं आहे. भाजप त्यांचा आणखी किती अपमान करणार आहे?
देवेंद्र फडणवीस आधी मुख्यमंत्री होते. मग तुम्ही (भाजप) त्यांना उपमुख्यमंत्री केलं. त्यानंतर आता अर्धे उपमुख्यमंत्री केलं आहे. हा फडणवीस यांच्यावरचा अन्याय नाही का? मी विरोधक म्हणून बोलत नाही. एखादा नेता कष्ट करीत असेल, स्वतःच्या ताकदीवर 105 आमदार निवडून आणत असेल तर त्याचा मानसन्मान करायला नको?
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहत आहेत. त्यांच्याबरोबर केवळ 40 आमदार आहेत तर तितकेच आमदार पक्षात असणारे अजित पवार हे दुसरे उपमुख्यमंत्री झाले आहेत. परंतु भाजपचे 105 आमदार असूनही देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत.
























































