
गुजरातच्या सूरतमध्ये रक्षाबंधननिमित्त विशेष मिठाई बाजारात आली आहे. 24 कॅरेट या मिठाईच्या दुकानात नेहमीच्या मिठाईसोबतच महागडी मिठाईदेखील आहे. यंदाच्या या दुकानाचे खास आकर्षण म्हणजे त्यांनी ‘बचपन का प्यार’ नावाची विशेष मिठाई रक्षाबंधनसाठी आणली आहे. ही मिठाई घेण्यासाठी सूरतच्या 24 कॅरेट या मिठाईच्या दुकानात गर्दी होत आहे.
नावाप्रमाणेच या मिठाईची चव घेतल्यावर प्रत्येक भावाबहिणींना त्यांचे लहानपणीचे प्रेमाचे दिवस आठवतील असे दुकानदरांचे म्हणणे आहे. या मिठाईची किंमत 580 रुपये किलो आहे. ही मिठाई बनवण्यासाठी लहान मुलांना आवडणाऱ्या बबलगम फ्लेवरचा वापर करण्यात आल्याचे दुकानदार राधा यांनी सांगितले. बबलगम नावाचा चॉकलेटचा फ्लेवर काही वर्षांपूर्वी लहान मुलांमध्ये लोकप्रिय होता. त्यामुळे या मिठाईत या फ्लेवरचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या मिठाईची चव घेतल्यावर प्रत्येक भावाबहिणींना त्यांचे लहानपणीचे प्रेमळ दिवस आठवणार आहेत. त्यामुळे या मिठाईचे नाव बचपन का प्यार असे ठेवण्यात आले आहे.
‘बचपन का प्यार’प्रमाणेच या दुकानात विशेष प्रकारची गोल्ड मिठाईपण ठेवण्यात आली आहे. त्याची किंमत 9 हजार रुपये किलो आहे. ही मिठाई परदेशात लोकप्रिय आहे. ऑर्डर घेऊनच ही मिठाई बनवण्यात येत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. नावाप्रमाणेच या मिठाईत सोन्याच्या वर्खाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे या मिठाईची किंमत जास्त आहे. त्यामुळे ऑर्डर घेऊनच ही मिठाई बनवली जात असल्याचे दुकानदारांनी सांगितले. मिठाईचे शौकीन असलेल्यांकडून या महागड्या मिठाईला चांगली मागणी असल्याचे सांगण्यात आले. सध्या विशेष मिठाईमुळे सूरतचे 24 कॅरेट हे मिठाईचे दुकान चर्चेत आले आहे.




























































