
उदय जोशी । बीड
आष्टीच्या सुरेश धसांपासून वडवणीच्या जगतापांपर्यंत गद्दारांची हकालपट्टी झाल्याने राष्ट्रवादी मोकळा श्वास घेत असल्याचे पक्षाच्या एका मेळाव्यात माजी आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटल्याने धस-सोळंके यांच्यातील वादाला तोंड फुटले आहे. “हर गुन्हा कबूल है हमे, बस्स …एलजाम लगाने वाला बेगुनाह हो” असे म्हणत धस समर्थकांनी सोळंकेना तोडीस तोड उत्तर दिले आहे. सुरेश धस भाजपमध्ये दाखल झाल्यापासून राष्ट्रवादी विरुद्ध धस असा सामना बीड जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. कधी धस-धनंजय मुंडे, कधी धस विरुद्ध अमरसिंह पंडित यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत.
सोळंके – धस यांच्यातील वाद तर दीड वर्षांपासून सुरू आहे. बीड जिल्हापरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीकडे बहुमत होते. प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगलाताई सोळंके अध्यक्ष पदाच्या उंबरठ्यावर असताना सुरेश धस यांनी बीड जिल्हापरिषदेचा अध्यक्ष प्रस्थापित नको तर सामान्य व्यक्ती पाहिजे म्हणत सोळंकेच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता. एवढेच काय आघाडी सरकारच्या सत्तेत प्रकाश सोळंके महसूल राज्य मंत्री असतांना सुरेश धस यांनी अजित पवारांच्या माध्यमातून यशस्वी खेळी करत प्रकाश सोळंके यांचे मंत्री पद घालवत स्वतः महसूल राज्यमंत्री झाले होते. मात्र पक्षाचा निर्णय असल्यामुळे सोळंकेंना गप्प बसावे लागले होते. हा सर्व संताप व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ असल्याने प्रकाश सोळंके यांनी धस यांना गद्दार म्हटले आहे. धसपासून त्याच्या समर्थकांची हकालपट्टी केल्याने राष्ट्रवादी मोकळा श्वास घेत असल्याचे त्यांनी वडवणी च्या मेळाव्यात म्हटले आहे. या वर सुरेश धस अद्याप काही बोलले नसले तरी त्याचे समर्थक वडवणी चे भारत जगताप यांनी फेसबुक पोस्ट टाकून राळ उडवली आहे. हर गुन्हा कबुल है हमे, बस्स ..इलजाम लगाने वाला बेगुनाह हो ” असे म्हणत सोळंकेंची खिल्ली उडवली आहे. यामुळे धस-सोळंके यांच्यातील राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
































































