
सामना प्रतिनिधी । सोलापूर
देशाला सक्षम नेतृत्व, शेतकऱ्यांना सन्मान, उद्योजक आणि उद्योजक वाढवून देशाची आर्थिक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन केंद्रीय उद्योग आणि नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभु यांनी केले. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि. 12 एप्रिल रोजी शिवस्मारक सभागृहात उद्योजक, व्यापारी आणि प्रतिभावंताच्या मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, प्रदेश भाजपा पदाधिकारी रघुनाथ कुलकर्णी,महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहर अध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, किशोर देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मागील सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि सक्षम नसलेल्या नेतृत्वामुळे देशाची प्रगती झाली नाही. परंतु गेल्या 5 वर्षात मोदी सरकारने देशाला सक्षम नेतृत्व तर दिलेच तसेच विकासाचा वेगही वाढवला. जगभरात आपल्या देशाची मान उंचावण्याचे कामही मोदी सरकारने केले आहे. सर्व सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे सरकार म्हणून मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर बसवणे गरजे असल्याचे ते म्हणाले. मागील 70 वर्षात जे झाले नाही ते मोदी सरकारने गेल्या 5 वर्षात केले. पायाभूत सोई सुविधा वाढवल्याने शेतकरी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. रेल्वेतील प्रवाशाला योग्य सेवा मिळत नसेल तर त्याला थेट रेल्वे मंत्र्याकडे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून त्या प्रवाशाला प्रवासातील अडचणी सोडवून चांगले प्रशासन देण्याचा प्रयत्नही मोदी सरकारने केला आहे असेही सुरेश प्रभु यांनी सांगितले.
सोलापूरला विमानाचे पार्ट तयार करण्याचा कारखाना होऊ शकतो
सरकारने सर्व सामान्यांनाही विमानातून प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे देशातील विमान वाहतूक उद्योगात मोठी वाढ होत आहे. जे विमान परदेशात तयार होतात ते आता आपल्या देशात तयार होऊ लागले आहेत. आगामी काळात देशाला जवळपास 5 हजार पेक्षाही अधिक विमानांची गरज पडणार आहे. त्यामुळे भविष्यात सोलापूरला विमान तयार करण्याचा कारखानाही होऊ शकतो, असे विधान नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभु यांनी केले.






























































