तळपण्यासाठी सूर्याला पुन्हा संधी

क्रिकेटप्रमाणे वन डेत सूर्यकुमारची बॅट अद्याप तळपली नसली तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत त्याला तळपण्याची संधी दिली जाणार असल्याचे खुद्द संघ प्रशिक्षक राहुल द्रविडने संकेत दिले आहेत. त्यामुळे या फलंदाजाला वर्ल्ड कपच्या अंतिम अकरा संघात आपली योग्यता दाखविण्याची आणखी एक संधी लाभणार आहे. तो या संधीचे सोने करतो की आणखी काय ते पुढील सामन्यात कळूच शकेल.

सूर्यकुमार यादवने आतापर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये जागतिक दर्जाचा अद्भुत खेळ दाखविला आहे, मात्र त्याला वन डे काही केल्या सूरच सापडत नसल्याचे दिसतेय. त्याला वारंवार संधी दिली जातेय, पण तो चाचपडतोच आहे. संघ व्यवस्थापन या सूर्याला तळपताना पाहाण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे दिग्गजांच्या विश्रांतीकाळात त्यांच्या पाठीशी पुन्हा एकदा संघ व्यवस्थापन असेल. तो पुढील दोन सामन्यांत हिंदुस्थानसाठी जोरदार खेळ करून पूर्ण सामना आपल्या खेळींनी फिरवेल, असा विश्वास खुद्द द्रविड याने व्यक्त केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवसाठी खूप महत्त्वाची असेल. अय्यरला आपली फिटनेस तर सूर्याला आपण वन डेतही झंझावाती खेळ करू शकतो, हे सिद्ध करायचे आहे. हे दोन्ही मुंबईकर वेगळे आहेत. त्यांना आपला खेळ दाखविण्यासाठी संघर्ष करावाच लागणार, असेही द्रविडने सांगितले.