
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) चेअरमन सुशील चंद्रा यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रा हे आयआयटीचे पदवीधर असून भारतीय महसूल सेवेतील 1980 च्या बॅचचे ते अधिकारी आहेत. चंद्रा यांच्या नियुक्तीने निवडणूक आयोगात आता सुनील अरोरा हे मुख्य निवडणूक आयुक्त तर अशोक लव्हासा आणि चंद्रा हे त्यांचे सहकारी आयुक्त आहेत. माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत हे निवृत्त झाल्यानंतर सुनील अरोरा हे मुख्य निवडणूक आयुक्त झाले. त्यावेळी अरोरा यांनी निवडणूक आयोगाचे एक पद रिक्त ठेवले होते.
पुणे पोलिसांकडून डॉ. आनंद तेलतुंबडे यांची चौकशी
पुणे – एल्गार परिषदेत शहरी माओवाद्यांचा हात असल्याच्या प्रकरणातील आरोपी विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांची आज पुणे पोलिसांनी दिवसभर कसून चौकशी केली. त्यानंतर सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आले. पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. एल्गार परिषदेच्या आयोजनात माओवाद्यांचा हात असल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































