
केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा केली. त्या घोषणेनंतर जुन्या 500 आणि 1 हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. सरकारने काही दिवसांनंतर त्या नोटांऐवजी नवीन 500च्या आणि 2 हजारांच्या नोटा जारी करण्यात आल्या. मात्र, गेल्या काही काळापासून या 2 हजारांच्या नोटा दुर्मीळ होऊ लागल्या आहेत. आता त्या बंद कराव्यात अशी मागणी भाजपच्या नेत्यानेच केली आहे.
2016मध्ये चलनात आलेल्या या 2 हजाराच्या नोटा एटीएममध्येही मिळेनाश्या झाल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, एप्रिल 2019 पासून बँकेने या नोटांची छपाई बंद केली आहे. पण, आता प्रश्न हा उरला आहे की ज्या नोटा छापल्या गेल्या होत्या, त्या गेल्या कुठे? या नोटांबाबत भाजपचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी संसदेत हा प्रश्न मांडला.
मोदी यांच्या दाव्यानुसार, दोन हजारांच्या नोटा बेकायदेशीर कृत्यांमध्ये वापरल्या जात आहेत. अनेक बेकायदेशीर आणि अवैध व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या नोटांचा वापर केला जात आहे. त्यामुळे सरकारने टप्प्याटप्प्याने या नोटा बंद कराव्यात, अशी मागणी मोदी यांनी केली आहे. अनेक ठिकाणी ही नोट आता अवैध असल्याच्या अफवा उठल्याचंही मोदी यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारने समोर येऊन याची स्पष्टता करावी. तसंच, आरबीआयने 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद केली असून आता मोठ्या प्रमाणात खोट्या नोटाही जप्त करण्यात येत असल्याचा दावा मोदी यांनी केला आहे.
या नोटांची साठेबाजी होत असून या नोटांचा वापर फक्त अवैध व्यापारासाठी होत आहे. अनेक ठिकाणी या नोटांचा काळाबाजार होत आहे. तसंच, अंमली पदार्थाच्या व्यवहारांमध्ये आणि दहशतवादाला आर्थिक पुरवठ्यासाठी देखील या नोटा वापरल्या जात असून त्या बंद कराव्यात अशी मागणी मोदी यांनी सरकारकडे केली आहे.



























































