बीजेपीची आम्हालाही ऑफर होती! शिंदे यांचा गौप्यस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, सोलापूर

भाजपकडून मला आणि कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना ऑफर होती, असा गौप्यस्फोट काँगेस नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. मात्र, जिवात जीव असेपर्यंत प्रणिती आणि मी काँगेसमध्येच राहणार असून, एकनिष्ठ असल्यामुळे ऑफर धुडकावली, असेही त्यांनी सांगितले.

माझ्याच तोडीचा असणाऱ्या भाजपच्या एका बडय़ा नेत्याने ही ऑफर दिली होती, असे सांगत सुशीलकुमार यांनी नाव सांगण्याचे टाळले. आपण काँग्रेसशी एकनिष्ठ असल्यामुळेच ही ऑफर धुडकावली आहे. कन्या प्रणिती ही सोलापुरातून काँगेसची आमदार असून, तिलाही अनेक वेळा भाजपकडून ऑफर येत असल्याचा दावा त्यांनी केला. आमच्या रक्तातच काँग्रेस असून, ‘जियेंगे या मरेंगे काँग्रेस के साथ ही’, असेही शिंदे म्हणाले.

सुजय विखे-पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबतही शिंदे यांनी मत मांडले. प्रत्येकालाच करीयर करायचे आहे. उमेदवारीवरून नाराज होऊन तरुण नेते पक्ष बदलत आहेत; परंतु मुलांना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र, राधाकृष्ण विखे हे काँग्रेसचे प्रामाणिक नेते आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारांबाबत त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असेही सुशीलकुमार यांनी सांगितले.