
‘‘महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी भाजपने एक ‘अमराठी बटालियन’च सुरू केली असून, यातून जाती-जातीचे द्वेषमूलक राजकारण सुरू आहे. भाजपने हे राजकारण थांबवावे,’’ असे खडे बोल शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुनावले आहेत. दरम्यान, ‘‘तुम्ही सत्ता स्थापन केली, हा आमचा राग कधीच नव्हता. राग असता, तर एखाद्याने आकांडतांडव, थयथयाट केला असता; पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असे काहीच केले नाही. त्यांनी ‘वर्षा’ बंगल्याच्या भिंती न रंगविता, अत्यंत शांतपणे आणि संयमाने राजपाट सोडला. त्यामुळे आम्हाला आमच्या पक्षप्रमुखांचा अभिमान आहे,’’ असे सांगत त्यांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या मिंधे गटाचाही समाचार घेतला.
शिवसेनेची ‘महाप्रबोधन यात्रा’ कालपासून कोल्हापूर जिह्यात आहे. काल कुरुंदवाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि आज कोल्हापुरातील केशवराव भोसले नाटय़गृहात झालेल्या सभांमधून उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि मिंधे गटावर जोरदार टीकास्त्र्ा डागले. यावेळी शिवसेना उपनेते, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना उपनेत्या संजना घाडी, कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी आमदार उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, अवधूत साळोखे, मंजित माने, शुभांगी पोवार, स्मिता सावंत, प्रतिज्ञा उतुरे, विराज पाटील, विशाल देवकुळे, राजेंद्र पाटील, विनोद खोत, संतोष रेडेकर, नियाज खान, राहुल माळी, विवेक काटकर, बाजीराव मालुसरे, बाजीराव पाटील, मंगला पाटील आदी पदाधिकाऱयांसह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
अडगळीत पडलेल्यांना खासदार केले
‘‘2019पूर्वी राजकीय अडगळीत पडलेले आणि त्यांची विश्वासघाताची परंपरा माहीत असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्यांना जवळ केले, पक्षाचे प्रवक्ते केले, एक रुपयाही न घेता शिवसैनिकांनी ज्यांना खासदार केले, त्या धैर्यशील माने यांनी याची जाण ठेवायला हवी होती. मात्र, आता यांना इंगा दाखविलाच पाहिजे,’’ अशी भावना सुषमा अंधारे यांनी बोलून दाखविली. निधी मिळाला नसल्याचे कारण सांगणाऱया यड्रावकरांना मिळालेल्या निधीचा त्यांनी पाढाच वाचला. ‘‘तुम्ही रात्रीच्या अंधारात कमांडो घेऊन चार्टर्ड विमानाने गुवाहाटीला गेला आणि आला. लोक तुमच्या पाठीशी आहेत, असे सांगता, तर ‘वाय’ दर्जाची सुरक्षा घेऊन कशाला फिरता?’’ असा सवालही त्यांनी यड्रावकर यांना केला.
मुख्यमंत्री शिंदे हे कळसूत्री बाहुले
‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णायक पदावर नाहीत. ते देवेंद्र फडणवीस यांच्या रिमोटची बाहुली आहेत. त्यांनी रिमोट चालू केला, तरच ते बोलतात. फडणवीस हे कळसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार आहेत. शिवसेना नाव, पक्ष, चिन्ह घेण्याचा प्रयत्न केला. ‘प्रतिशिवसेना भवन’ बांधण्याचे सांगता. मात्र, त्यावर तुम्ही कितीही मजली सेना भवन बांधा; पण त्याला जे पाहिजे, ते अधिष्ठान मिळेल का?’’ असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. ‘‘स्वतःला कधी रिक्षाचालक, तर कधी शेतकरी सांगणारे एकनाथ शिंदे गुवाहाटीला विशेष चार्टर्ड विमानाने जातात, शेतातही बग्गीने जातात, मग ते गरीब शेतकरी कसे? आपला भाऊ सर्वांचीच ताटे हिसकावून घेत असेल, तर बहीण म्हणून त्याला योग्य वेळी खडसावायला लागते,’’ असेही त्या म्हणाल्या.



























































