IBF च्या सदस्यात्वातून ‘रिपब्लिक टीव्ही’चे तत्काळ निलंबन करा, NBA ची मागणी

न्यूज ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन (NBA)ने स्पष्ट म्हटले आहे की, लीक व्हॉट्सअॅप संदेशांतून समजते की ‘रिपब्लिक टीव्ही’ साठी काही महिने खोट्या पद्धतीने रेटिंग मध्ये हेराफेरी करून दर्शक संख्या जास्त दाखवली गेली आणि दुसऱ्या चॅनल्सची रेटिंग कमी करण्यात आली. म्हणजे रिपब्लिक टीव्हीला फायदा पोहोचवण्यात आला होता.

ARG आउटलायर मीडिया (रिपब्लिक टीवी) चे व्यवस्थापकीय संचालक (मॅनेजिंग डायरेक्टर) अर्णब गोस्वामी आणि BARC इंडियाचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यात झालेल्या शेकडो WhatsApp संदेशांमधून न्यूज ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन (NBA) स्तब्ध झाला आहे. एनबीएने म्हटले आहे की, मेसेजमधून हे स्पष्ट आहे की, रिपब्लिक टीव्हीने टीआरपी रेटिंग जाहीर करणाऱ्या संस्थेला मॅनेज करत आपली व्ह्यूअरशीप जास्त असल्याचे दाखवले.

एनबीएने रिपब्लिक टीव्हीला तात्काळ इंडियन ब्रॉडकास्ट‍िंग फाउंडेशन (IBF)च्या सदस्यत्वापासून निलंबित करण्याची मागणी केली आहे. एनबीएने म्हटले आहे की, ‘या व्हॉट्सअॅप मेसेजमधून स्पष्ट दिसत आहे की, रेटिंग मध्ये हेराफेरी करून दर्शक संख्या जास्त असल्याचे दाखवले होते. म्हणजे रिपब्लिक टीव्हीला अयोग्यरित्या फायदा पोहोचवण्यात आला आहे. केवळ रेटिंग नाही तर सत्तेचा खेळ देखील यातून दिसून येत आहे. दोघांमध्ये केंद्र सरकारच्या सचिवांची नियुक्ती, कॅबिनेटमधील बदल, पीएमओपर्यंत आपली असलेली पोहोच, सूचना आणि प्रसारण मंत्रालयातील कामकाजा संदर्भातील माहिती याचीही चर्चा केली आहे. यामुळे एनबीएकडून गेली चार वर्ष करण्यात आलेल्या तक्रारारीला पुष्टी मिळाली आहे. त्यामुळे रिपब्लिक टीव्हीची सदस्यता तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंत हे निलंबन कायम रहावे अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

रिपब्लिक टीव्हीमुळे प्रसार माध्यमांची प्रतिमा मलीन झाली आहे, असेही एनबीएने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या